रविवार, १५ एप्रिल, २०१२

आयुष्यावर बोलू कांही




Add caption

आयुष्यावर बोलू  कांही

संगीतकार व गायक डॉक्टर सलील कुलकर्णी आणि कविवर्य संदीप खरे ह्यांचा झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रम  "आयुष्यावर बोलू कांही" पाहत व ऐकत असताना मला वाटले हे आयुष्यावर जे बोलत आहेत ते बहुतांशी काव्यात, आणि ते स्वाभाविक होते कारण एक गायक  तर दुसरा गीतकार . दोघांच्या जीवनाचा मुलभूत आधार,उद्दिष्ट,प्रचार हेच मूळी संगीत आहे. मनात क्षणिक विचार आला  आपण सुद्धा असे कांहीतरी करून पहावे, पण काव्य क्षेत्रातील आपली गुणवत्ता लक्षात घेता लक्षात आले कि नाही this is not my cup of tea . काव्य, गायन, संगीत ह्यांची आवड असणे आणि ते अंगीत असणे ह्यात जमीन आस्मानचा फरक आहे. पण गद्यात म्हटले तर वाटले शक्य आहे, कारण लेखन प्रांतात अश्यातच बर्या पैकी अनुभव आला आहे, कांही असो, रंगमंचावर उभे राहून हे सर्व प्रस्तुत करण्याचे धाडस आता राहिले नाही. मग  काय ठरले कि आयुष्यावर लिहू कांही, घेतली लेखणीची परवानगी आणि सुरु  झालीलेखनाची इफ्तीदा                         

 "आयुष्यावर लिहू कांही"  

 मला वाटते बोलणे व लिहिणे ह्यातील तफावत नाटक आणि चित्रपटा ह्यातील तफावती सारखे आहे एक जिवंत,तर  दुसरे रिटेक घेण्याची मुभा असलेले, दुरुस्ती करण्याची संधी असलेले. एक रेकॉर्ड तर दुसरे document .

आयुष्य  व जीवन ह्यात काय फरक आहे,  माझ्या मते  आयुष्य  
जगण्याचा मार्ग म्हणजे जीवन, एक पथिक व एक पथ. आयुष्य, जीवन प्रालब्ध नशीब रुणांबंध हे शब्द जरी समानार्थी नसले तरी एक मेकांशी येव्हढे निगडीत आहेत कि त्याना निराळे करणे मुश्कीलच नाही तर नामुमकीन आहे. एका विषयी लिहिताना दुसरा त्याचां हात धरून आपोआपच प्रगट होतो.

आयुष्य म्हणजे आजच्या काव्याप्रमाणे चुलीवरच्या कढईतले कांदे पोहे, का जुन्या काव्याप्रमाणे तव्यावरची भाकर ? कांही असो दोहोनाही चटके खाणे अनिवार्य  आहें.

आयुष्य म्हणजे काटेरी रस्ते का गुलाबाच्या फुलांची पायवाट ? मला वाटते आयुष्य म्हणजे गुलाबा सोबत काटे सुद्धा, कारण काटे नसतील तर गुलाबाची किंमत समजणे कठीण. कोण्या शायराने म्हटले आहें ना 'न मिलता गम तो बरबादी के अफसाने कंहा जाते, अगर दुनिया चमन होती तो वीराने कंहा जाते. '

आयुष्य  म्हणजे सुखाच्या दुधाला दुखाच्या विर्जणाने लावलेले आंबट गोड दही ,का दोन्हीचे स्थायी भाव टिकवून झालेली नवीन निर्मिती?

आयुष्य म्हणजे मंजुळ  गोड पाण्याचा झरा का गढूळं   पाण्याची खोल विहीर ? उत्तुंग उंच पर्वत का खोल खोल भयानक दरी, पाण्याचा बुडबुडा  का आकर्षक कारंजे ?

आयुष्य म्हणजे लोणावळा खंडाळा घाटातील चढाव उताराचे नागमोडी रस्ते का नव्याने झालेला पुणे मुंबई एक्ष्प्रेस्स हायवे  ?
का
ग दि मा ने म्हटल्याप्रमाणे सुख दुखांच्या धाग्याने विणलेले वस्त्र ? ज्या वस्त्राचा मध्यभाग दुखांच्या धाग्याने विणला गेलाय आणि ज्याची किनार सुखाच्या धाग्याने.  अर्थात सगळ्यांचे   वस्त्र सारख्याच धाग्याने विणलेले नसते हे सत्य आहे.

मला वाटते आयुष्य म्हणजे निरनिराळ्या पदार्थाने भरलेले जेवणाचे ताट.
एक एक पदार्थ म्हणजे एक एक भोग, नशिबाचा वाटा. कांही गोड  सुखद  कांही आळणी तिखट दुखद. कोणाच्या ताटात काय वाढले  असेल ह्याचा अंदाज नाही पण जे वाढले गेले ते गोड मानून, चवीने खाऊन पचवण्याची शक्ती ज्याला  प्राप्त झाली,  त्याला आयुष्य जगण्याची युक्ती गावली असे म्हणण्यास हरकत  नाही.

आयुष्याला चंदनाच्या खोडाची उपमा सुद्धा देतात , जे स्वता: झिजत जाते पण शेवट पर्यंत सुगंध देत राहते, पण सगळ्यांची आयुष्य चंदनासारखी नसतात, अगदी बोटावर मोजण्या सारख्या माणसांच्या आयुष्याला हि उपमा सजते, जे फार उच्च आचार विचाराचे असतात.
आयुष्य म्हणजे लोण्याचा गोळा तर नाही, जो चटके खात वितळतो, पण तुपासाराख्या एक सुगंधी, स्वादिष्ट, शुध्द व अत्यंत उपयुक्त पदार्थाची निर्मिती करतो. जसे  मानवाचे आयुष्य संपले तरी वारस रुपात तो एक निर्मिती समाज घटने साठी मागे सोडतो. अर्थात हे तूप कधी कधी करपलेले पण असू शकते.


आयुष्य ही खूप मोठी उल्झन आहे . अगदी जन्म मरणासारखी गूढ रहस्यमयी . सुखवस्तू लोकांपेक्षा गरीब किंवा पांढरपेशी लोकाना आयुष्याचा खरा अर्थ लवकर आणि नीट समजतो , कारण प्रत्येक उजेडणारा नवीन दिवस हा त्यांच्या करीता समस्यांनी भरलेल्या प्रश्न  पत्रिके सारखा असतो, आणि त्याच्यावर  मात करण्यासाठी थोडी पूर्व तयारी करावी लागते . शब्दात समजावणे कठीण, पण ह्याला म्हणतात जिसने जिंदगी नजदिकसे देखी हैं उसे जिंदगीका मतलब समझ मे आता हैं, भले मतलब कांही असो. 

मी वर म्हटल्या प्रमाणे आयुष्य एक मोठे रहस्य आहे, उद्या काय होईल ह्याची पुसटशी सुद्धा कल्पना नसते, राजाचा रंक होवू शकतो किंवा रंकाचा राव  सुद्धा, असल्याचे नसणे  होवू शकते, ज्याला आपण नशीब, प्रालब्ध, विधिलिखित अश्या अनेक सौन्द्न्या देवून सामोरे जातो. त्यासाठी" कल क्या होगा किसको पता अब जिंदगीका लेलो मजा" असे म्हणून प्रत्येक क्षण जगला पाहिजे आनंदाने हसत                                LIVE LIFE KING SIZE 

कोणास वाटते  जीवन म्हणजे दुखाची खोल दरी, जेथे जगणे किंवा मरणे कोणाच्या हातात नाही, तर कोणास वाटते जीवन हा एक खूप सुखद प्रवास आहे. माणसाच्या दोन जाती आहेत एक सकारत्मक विचार करणार्यांची ज्याना खुश मिजाज म्हणता येईल  व दुसरी नकारत्मक विचार धारणीची, ज्याना सुखातही दु:ख शोधण्याची सवय  असते व ते कधीच आनंदी राहू शकत नाहीत. ज्याचे त्याचे प्राक्तन .

'जिंदगी  के सफर में गुजर जाते है जो मकां वो फिर नही आते', 'आने वाला पल जानेवाला है', 'गुजरा हुआ जमाना आता नही दोबारा हाफिज खुदा तुम्हारा ' ह्या सर्व पंक्ती काय सुचवतात कि प्रत्येक क्षण मोलाचा आहे, गेली घडी ना यायची तेंव्हा प्रत्येक क्षण जगा जगा आणि जगा, ते पण स्वता: साठी नाही तर सर्वांसाठी.

आपने लिये जिये तो क्या जिये तू जी ऐ दिल जमाने के लिये.

आयुष्य कंठण्या साठी किंवा जीवन जगण्या साठी माणसाला कसला तरी आधार म्हणा किंवा बहाणा लागतो. बहाणा खुबसुरत असेल तर जगणे पण हसीन वाटते, इतके सुंदर कि म्हणावे वाटते                        The life is worth living twice 
 आणि जगण्याचा हेतू केवळ जीवन आहे म्हणून जगावयाचे तर मग म्हणावयाची पाळी येते                  OH GOD 

कोणाला कला तर कोणाला क्रीडा कोणाला संगीत  तर कोणाला काव्य लेखन, कोणाला संसार तर कोणाला पर्यटन अश्या एक नाही तर अनेक कारणास्तव माणसाला जगण्याची प्रेरणा मिळते. आणि मग येतील त्या समस्यांना सामोरे जावून जो आपले उद्दिष्ट साधतो तो म्हणवला जातो जो जिता वोही सिकंदर

आयुष्या पासून माणसाच्या खूप अपेक्षा असतात, कधी त्या पूर्ण होतात तर कधी अपूर्ण रहातात.  सफलतेचे माणूस जश्न मनवतो, आणि यशाबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतो . पण अपयशा बद्दल परिस्थितीला किंवा परमेश्वराला जबाबदार ठरवतो , हे योग्य नाही. परिस्थितीवर मात करणे हा तर खरा आयुष्याचा लढा.

एकदा लिहिण्यास बसले कि विचाराना बांध घालणे कठीण जाते, अलीकडे माझ्या लेखणीने  बरीच विस्तारित  प्रवास वर्णने लिहिण्याची जोखीम पार पाडली. वर्णने वाचून आमचे चिरंजीव म्हणाले, बाबा प्रत्येक इनिंगला शतक मारलेच पाहिजे असे नाही, कधीतरी अर्ध शतक मारून दुसर्या फलंदाजाला मौका द्या. तारीफ करण्याचा एक निराळाच अंदाज...........  म्हटले मान्य! कदाचित माझा वाचक वर्गच  हे मला सूचित करत असेल. वास्तविकता हा विषय एव्हढा गहन आहे कि, ह्या इनिंगला एक नाही चांगली दोन शतके मारू शकतो, पण नको, इथेच इनिंग DECLARE .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा