टेम्पो मध्ये यात्रिक
माता वैष्णोदेवीच्या न झालेल्या दर्शनाची व्यथा मनाला कोठे तरी बोचत होती, ही बोच स्वस्थ बसू देत नव्हती, मग काय ? केली पुन्हा: दर्शनाची योजना, सोबत प्रयाग, अयोध्या ,बनारस, पशुपतीनाथ ही देवस्थाने आणि डलहौसी, धरमशाला, चंदिगढ,वगैरे प्रेक्षणीय स्थाने जोडून पंधरा दिवसांचा कार्यक्रम आखला, खर्चाचा आढावा घेतला, जुने व उत्सुक यात्रीकांशी संपर्क साधला, आणि झाली तयारीस सुरुवात. प्रथम बरेच सभासाद गोळा झाले, पण कांही जणांच्या, वयक्तिक समस्या, तर कांही जणांची कारणा साठी दिलेल्या कारणास्तव एकंदर ९ यात्रिकच जमले, नागपूरचे साठे दाम्पत्य हे नवीन सभासद आम्हाला भेटले. जे मागे राहिले त्यांनी बरेच कांही मिस केले, जे सोबत आले त्याना बरेच कांही गावले , ते कसे ?
चार वर्षातून एकदा, म्हणजे लीप इयर मध्ये येणारा २९ फरवरी हा दिवस आम्ही प्रयाणा साठी निवडला , माझ्या सोबत विद्या, श्वेता,भूमकर आणि गणेश असे पांच जणे आम्ही SCPNB एक्ष्प्रेस्स मध्ये सकाळी १० वाजता प्रयाग (आमच्या प्रवासातील पहिला थांबा) ला जाण्या करीता चढलो. लड्डा परिवाराची अनुपस्थिती प्रामुख्याने जाणवली, ते प्रवासी जरी दोन असले, तरी त्याना निरोप द्यायला येणार्यांची संख्या !!!! हजला जाणार्या मुख्तार किंवा सय्यद हुसेनला निरोप द्यायला येणार्या संख्यका सारखी असते, फळे विक्रणारे, चहावाले, हमाल आणि ठेलेवाल्यांचा निरोप घेवून आम्ही प्रयाणाचा प्रारंभ केला. थोडा वेळ आम्ही पत्ते खेळलो, दुपारचे जेवण घेतले व चक्क आराम केला, ते नागपूर येईपर्यंत. नागपूरला काका काकू आणि त्यांचे व्याही दाम्पत्य साठे हे आम्हाला जॉईन झाले, रात्री ओकांच्या गुळाच्या पोळ्या, साठ्यांच्या साटोर्या (वर्हाडात सांजोर्या म्हणतात) आणि जोश्यांची खिचडी, तोंडी लावण्यास हिरव्या मिरचीचे लोणचे, व कौलीफ्लावरची भाजी, असा मेनू होता. दुसरे दिवशी सकाळी ११ चे सुमारास इलाहाबादला आम्हाला रिसीव्ह करण्यास पैठणकर गुरुजी आले होते, स्वामी नारायण आश्रमात उतरण्याची सोय आगाऊ करून ठेवली होती, सोय माफक दरांत पण उत्तम होती, आम्ही ताजे तवाने झालो , आश्रमात जेवणाच्या पंक्ती सुरु झाल्या, गरम गरम पुर्या, स्वादिष्ट भोजन परोसले जात होते, तोंडाला पाणी सुटले, पण आम्हाला संगमावर जाण्याची घाई असल्याने, आम्ही त्या स्वादिष्ट अन्नाचा त्याग करून त्रिवेणी संगमा कडे धाव घेतली. वेळेअभावी वेणीदान कार्यक्रम रद्द केला, जोशी, साठे हे नावेत बसून संगमावर गेले, आम्ही टेंपोत बसून आजूबाजूची गम्मत पहात हलकीशी पोटपूजा केली. (ह्या आधी म्हणजे गेल्या वर्षी आम्हा उभयतांचे हे सर्व विधी झाले होते) नंतर लंबा हनुमानाचे दर्शन घेतले, हा हनुमान लंबा का झाला (आडवा होणे) हे मी पुजार्याला विचारले, तो म्हणाला हनुमान आराम कर रहा हैं, पण ते का ह्याचे समाधानकारक उत्तर मला मिळाले नाही, असो- गब्बर सिंग डोसा खात खात, आनंद भुवन हे नेहरूंचे निवास स्थान बाहेरूनच पाहिले, व धूळ खात अयोध्येच्या मार्गास लागलो.
त्रिवेणी संगम
रिक्षा सवारी बनारस
त्रिवेणी संगमाच्या मार्गावर
अशोक पासवान हा मक्ख चेहर्याचा यु पी चा भय्या, आमचा वाहन चालक, ह्याच्याशी संवाद साधणे अतिशय कठीण होते, त्याने एखाद्या डाकू सारखे आपले डोके, कान व गळा लाल कापडाने घट्ट बांधले होते, कदाचित त्यामुळे त्याच्या कानावर जू रेंगत नव्हती, एकंदर त्याचा पेहराव, व गाडीतील अस्वच्छता पाहून स्वच्छता हा शब्द त्याच्या पासून कोसो दूर असावा असे वाटले. इलाहाबाद हून त्यांनी गाडी सोडली ती चहा साठी सुद्द्धा थांबावयास तो राजी नव्हता, जबरदस्तीने एका धाब्यावर जेवणास थांबला. आम्ही खरे रात्री तेथे थांबा घेण्याचा विचार करत होतो, पण अभी एक घंटे मे आपको अयोध्या ले चालता हुं म्हणून त्यांनी गाडी सुरु केली, त्याच्या हिशोबी असलेला त्याचा शार्ट कट मार्ग म्हणजे शरीरातील हाडे मोजण्याचा एक उत्तम मार्ग होता, मार्गावर आमचे एकमेव वहान दिसत होते, त्या कच्च्या रस्त्यावर लाईट असण्याची शक्यता नव्हती, फक्त थोड्या थोड्या कोसांवर चार घरांची का होईना गावे होती ही जमेची बाजू. आमच्या कोणत्याही बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होत नव्हता, उलट त्याच्या मालकाला तो फोन वर म्हणाला का गिराईक हैं , हमरा भेजा खाता हैं, उन्हे तनिक कुछ बोलो, आम्हाला गप्प बसणे प्राप्त होते. एक चांगले म्हणजे रात्री १०.३० चे सुमारास त्यांनी आम्हाला आमच्या इच्छित जागी अयोध्येला पोहन्चाविले. जैन पंथीय लोकांनी चालवलेल्या ह्या आश्रमात रहाण्याची सोय चांगली होती. दुसरे दिवशी सकाळी माकडांच्या आवाजाने जाग आली, अयोध्या म्हटल्यावर वानरसेना असणे स्वाभाविक होते. तयार होवून राम जन्म भूमी बघण्यास निघालो.
अयोध्या मंदिराचे पुजारी देशपांडे यांनी देवदर्शन व इतर महत्वाची स्थाने बघण्याची सोय उत्तम केली होती. धर्मक्षेत्री एक गैरसोय मात्र बहुधा असते ती म्हणजे मोठ्या गाड्या मंदिराच्या जवळ जात नाहीत, गाडी कोठे तरी दूर थांबवावी लागते, तेथून पुन्हां दुसरे वाहन घेवून जावे लागते, अथवा मग आपल्या दोन पायांची गाडी. आणि कांही जागी ते शक्य नसल्यास दुरून दंडवत करावे लागते, आपले पाय त्या पावन भूमीला लागले असे म्हणून समाधान करून घ्यावयाचे. असे कांही तरी अयोध्येला फक्त राम जन्मभूमीला जाताना झाले, शरयू मंदिराजवळंच काळा राम मंदिर हे प्राचीन मंदिर तसेच इतर महत्वाची स्थाने नीटपणे बघण्यास मिळाली , हे छान झाले . ज्याना शक्य होते त्यांनी कडक पहार्यातून जावून राम जन्मभूमी स्थान व बाबरी मस्जीद्चे अवशेष बघितले तोपर्यंत आम्ही उभयता रिक्षेत बसून गरम गरम चहा घेतला, व आकर्षक वस्तूंची दुकाने बघण्यात वेळ सार्थकी लावला. आमचा रिक्षावाला गुड्डू इतका देखणा व पिळदार शरीर यष्टीचा होता कि, वाटले एखाद्या फिल्म प्रोडूसरची नजर ह्याच्यावर पडली तर ह्याचे सोने होईल, ५० रुपयांचा दिलेला मोबदला घेऊन तो दुसरे गिर्हाईक शोधण्यास निघून गेला, मला उगीचच त्याच्या भवितव्या विषयी काळजी वाटली.
काला राम मंदिर, शरयू घाट अयोध्या
दो हंसोका जोडा
देवदर्शना नंतर गरम गरम जलेबी, व पुरी साग असा, उत्तर प्रदेशीय नाश्ता यत्थेच घेवून दुपारचे जेवण स्किप करण्याचे ठरवून, वाराणसी, उर्फ बनारस उर्फ काशी च्या मार्गास लागलो. पासवान बाबाने आमचा जणू बदला घेण्याचा कस धरला होता, त्याने पुन्हा गाडी त्याच त्याच्या आवडत्या शोर्ट कट मार्गावर वळवली, त्याला कांही बोलणे , म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी घालण्या सारखे होते, त्यामुळे आलिया भोगाशी असावे सादर म्हणून आम्ही तोंडे लॉक केली. किलो मिटरचा हिशोब मांडल्यास ५ तासात काशीला पोहंचन्यास हरकत नव्हती, पण उत्तर प्रदेशात फिरताना एक लक्षात आले कि यु पी त असंख्य गावे, कसबे, पेठी आहेत त्यामुळे गाडीला फार गती घेता येत नाही, थोडी गती घेईपर्यंत येणारे गाव, तेथील बाजार, शाळा गतिरोधक बनतात, त्याशिवाय रस्त्यांची हालत, तारीफे काबील ! त्यात आमची नाडी पासवान्च्या हातात, केंव्हा एकदा बनारस येते, असे झाले होते, आमचा पासवान बरोबरचा करार येथे संपणार होता. एकदाचे बनारस आले, आमच्यां आरक्षित गेस्ट हौस वर आम्ही संध्याकाळी ५.३० च्या सुमारास सुरक्षित पोहोंचलो . व्यवस्थित पोहन्चल्या बद्दल देवाचे आभार मानले, पासवानला बक्शिश दिले व अलविदा म्हटले. आज हे सगळे आठवून खूप हसू येते,पण त्या क्षणाला झालेली हालत बयाने काबील नाही . मला वाटते असे किस्से यात्रेत हवेतच, नाहीतर मग अगदी आळणी वाटते.
गंगा आरतीची वेळ होत आली होती, गेस्ट हौस वर सामान ठेवले, चहा घेतला व उंच उंच सायकल रिक्षेत बसून गंगेच्या दष्मवेश घाटाकडे वळलो, गेल्या वर्षी येथे चार दिवस राहून गेलो असल्याने रस्ते अनोळखी नव्हते, पोलिसांच्या सहकार्यामुळे आमची रिक्षा अगदी घाटाच्या जवळ नेता आली. मंत्रमुग्ध करणारी आरती डोळे भरून पाहिली, कानाने श्रवण केली व मुखाने म्हटली, थकवा दूर झाला.
दष्मवेश घाटावर संध्याकाळची गंगा आरती
` विद्या पंडित गाय घाटावर
परतताना मारवाडी जेवणाचा स्वाद घेतला, व गेस्ट हौस वर आलो, शिधोरे गुरुजी उद्याच्या पूजे विषयी सांगण्यास आले, उद्या सकाळी आठ म्हणजे आठ, ८.०५ नाही ७.५५ पण नाही असे कोकणस्थी शब्दात सांगून शिधोरे गेले. आम्ही दुसरे दिवशी सकाळी ८ ला तय्यार ! अर्पित ,गुरुजींचा मुलगा वेळेवर आला त्याच्या सोबत कमलेश त्रिपाठी हा त्याचा सहाय्यक होता, त्याने transport ची जुळवा जुळव केली आणि आम्ही गाय घाटला पन्नास पायर्या उतरून गेलो . गंगा पूजन झाले, रामेश्वर वरून आणलेला सेतू पूजे उपरांत, गंगेत विसर्जन केला आणि बोटीत सवार होवून निरनिराळे घाट बघत ललिता घाटावर आलो, येथून पन्नास मोठ्या पायर्या पार केल्यावर विश्वेर्श्वराच्या देवळाचे प्रवेश द्वार आहें, मध्ये एक फर्लांग भुयारवजा मार्ग आहें. देवळाच्या आवारात बसून अभिषेकाचा संकल्प सोडला, स्वहस्ते महादेवाला अभिषेक केला, दर्शन घेतले व थोडेसे पुढे असलेले मा अन्नपूर्णेचे मंदिरात कुमकुम अर्चनेसाठी गेलो .त्या नंतर, तेथील अन्न छत्रात जेवण रुपी प्रसाद घेतला. काळभैरव ज्याला गावाचा रक्षक मानतात, त्याच्या दर्शनास गेलो, काळभैरवाच्या दर्शना शिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही असे म्हणतात. गेस्ट हौस वर जाऊन आपापली बोचकी उचलली व दिल्लीला घेवून जाणार्या शिवगंगा एक्ष्प्रेस्स मध्ये चढण्यास संध्याकाळी ६.३० वाजता वाराणसी स्टेशन गाठले, त्या आधी बनारस प्रसिद्ध रबडीची चव चाखण्यास विसरलो नाही. गाडी वेळेवर आली, प्रसादाची पाकिटे घेवून, निरोप देण्यास शिधोरे गुरुजी फलाटावर आले होते. स्टेशन वर सोडण्यास किंवा घेण्यास कोणी आले कि बरे वाटते. रात्रीच्या पोटा पाण्याची बेगमी बरोबर होती, त्याला न्याय दिला व निद्रेच्या आधीन झालो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा