जन्नत ए कश्मीर
आमच्या सफरीचा श्री गणेश: वास्तविकता : कोजागिरीला आग्रा येथील ताज दर्शनाने व्हावयाचा होता , पण तेलंगाना आंदोलन समितीला हे मंजूर नसावे, कारण आम्ही ज्या दिवशी प्रयाणास निघणार होतो त्याच्या दोन दिवस आधी पासून ह्या समितीने रेल रोको ची घोषणा केली. तत्परतेने आम्ही प्रवासाची तारीख अलीकडे घेवून, तत्काल मध्ये तिकीटाची व्यवस्था करून, दगडावर दगड घालून, show must go on ह्या नार्या नुसार प्रवासास सुरुवात केली . नागपूर मार्गे प्रवास आणि आमच्या काका काकूंची भेट नाही हे अश्यक . आमच्या तेरा जणांच्या टीम साठी काकूने आणलेल्या पुरणाच्या पोळ्या व मसाले वडे म्हणजे त्यांच्या पाक कौशल्याचा एक उत्तम नमुना म्हणता येईल. असे कांही प्रसंग नक्कीच डोळ्यात आनंदाश्रू दाटवतात. दिल्ली स्टेशन बाहेर मोहन ह्या टूर संचालकाने जेव्हा रिंकू driver न आल्याचे सांगितले तेव्हा सगळेच खट्टू झाले. जितु ह्या driver सोबत परिचय झाला, जीत अच्छे व्यवहारसे सबका मन जीत लो , असे मी त्याला म्हणालो. इतर प्रवाश्यान विषयी मला माहित नाही, पण मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या त्याच्या स्वभाव गुणाने आमच्या परिवाराचे मन निसंशय जिंकले. पोटचा मुलगा काय करील एव्हढी त्यांनी मदत केली, प्रशंसा केल्या वाचून रहाववत नाही. हरिद्वार , बृन्दावन, मथुरा अशी देवस्थाने करत सफरीस देवदर्शनानेच सुरुवात झाली (आखिर वो ही होता हैं जो मंजुरे खुदा होता हैं) . ठरल्या प्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला मात्र आग्रा गाठले. त्या आधी.................. बृन्दावनला पहाटे चार वाजता एका बंगाली आश्रमात येवून पोहोंचलो, तेव्हढ्या पहाटे कोठे रहाण्याची व्यवस्था होणे अवघड होते, म्हणून हा आश्रमाचा मिळालेला आश्रय बुडत्याला काडीचा आधार म्हटल्या प्रमाणे आधारास आला. प्रातविधी आटोपून जवळच असलेल्या मंदिराकडे धाव घेतली. सुरेश भूमकर , ह्या माझ्या मित्राच्या स्वभावाचा आणखी एक वाखाणान्या लायक पैलू मला अनुभवायास मिळाला. विद्याच्या सहायासाठी गणेश होता, पण सुरेशने पटकन पुढे होवून माझ्या व्हील चेअरचा ताबा घेतला. तेव्हढ्या मोठ्या प्रांगणात त्याने मला फिरवलेच, पण तेथून पुढील पूर्ण प्रवासात त्याने मलाच नाही तर विद्या व श्वेताला जी मदत केली त्याची स्तुती शब्दात करणे अशक्य. त्याच्या स्वभावाचा हा पैलू इतके दिवस माझ्या पासून तरी दडून होता. बृन्दावन दर्शन घेतले व दुपारच्या उन्हात मथुरेस श्री कृष्ण जन्मस्थान बघण्यास निघालो. केवढा विरोधाभास, कृष्ण जन्म मध्यरात्री मुसळधार पावसातला व आम्ही ऎन दुपारी भर उन्हात तेथे होतो. मंदिर भव्य दिव्य व स्वच्छ आहें, सर्व तीर्थक्षेत्री असतात तशी येथेही अन्नछत्र आकर्षक वस्तूंची दुकाने इत्यादी आहेत.

बृन्दावन प्रवेशद्वार
तेरे जैसा यार कंहा
एक किस्सा मी नमूद करण्यास विसरलो. आमच्या आतापर्यंत च्या प्रवासात गाण्याच्या भेंड्यांची खुमासदार महेफील रंगली होती. स्त्री वर्ग vs पुरुष वर्ग अश्या टीम्स होत्या. सौ शुभांगीताई गद्रे ह्यांच्या मराठी गाण्यांच्या ठेव्यातून त्या ज्या पद्धतीने एक एक गाण्यांची गोलंदाजी करत होत्या, त्यावरून मला आपण सा , रे, ग, म, प च्या मंचावर तर नाही ना असे वाटत होते. आमच्या प्रत्येक हिंदी गाण्याच्या अन्ताक्षराला त्यांच्या मराठी आद्याक्षराने जवाब मिळत होता. दोन्ही बाजू मजबूत होत्या, त्यामुळे नतीजा अनिर्णितच राहिला. ह्या कार्यक्रमाचे पुन: प्रक्षेपण व्हावे असे खूप वाटत होते पण ते घडले नाही ह्याची खंत तर वाटतेच, पण ते न होण्या मागची घटना...........उत्सुकुता ताणून शेवटी. "एक शहेन्शाहने बन्वाके हंसी ताजमहल, सारी दुनियाको मोहब्बत की निशानी दि हैं " शकील बदायुनी ह्यांच्या कलमेतून उतरलेली लीडर चित्रपटातील ही प्रेमाची गाथा , चित्रपट ऐतिहासिक नाही, पण शायरीचे बोल आपल्याला नक्कीच मोघल साम्राज्याच्या काळात घेवून जातात. वास्तविकता मोघल साम्राज्यात सगळ्यात जास्त गाजली, ती सलीम आणि अनारकलीची प्रेमकहाणी. शहेनषः शहाजान च्या गहार्या प्रेमापेक्षा, त्या प्रेमाच्या पायावर उभी केलेली ताजमहल ही कलाकृतीच मात्र इतकी प्रसिद्ध झाली की जगातील सातव्या आश्चर्यात त्याची गणना होते. चवदाव्या बाळंत पणात दिवंगत झालेल्या आपल्या प्रिय मुमताज बेगमच्या आठवणीत , आपल्या आयुष्याची २२ वर्षे गुंतवून, करोडो रुपये खर्च करून, २०००० मजूर कामाला जुम्प्वून बेगमच्या प्रेमाला दिलेली ही अविस्मरणीय पावती, कदाचित तिला जन्नत मध्ये सुखी ठेवण्यात कामास आली असेल. असे सांगण्यात येते की ताजमहाल ही कलाकृती पूर्ण झाल्यावर शाहजानने त्या मजुरांचे हात तर कापलेच पण त्यांचे डोळे पण काढून घेतले ..... कारण अशी कलाकृती पुन्हा त्यांच्या कडून घडू नये व ती त्यांना पाहाता पण येवू नये. ह्या क्रूर कृत्याकडे कोणीही एक भयंकर कृत्य, एक अक्षम्य गुन्हा, किंवा एक घोर पाप म्हणूनच बघणार. पण नाण्याला दोन बाजू असतात, आपण जर नाण्याची दुसरी बाजू पाह्यली तर आपल्याला शहाजाहा च्या निस्सीम प्रेमाची खोली लक्षात येईल. क्षणेक पण मी त्याच्या कृत्याचे समर्थन करत नाही आहें, पण स्वतःला त्याच्या जागी ठेवून विचार केला एवढेच. विचार हे स्वपानासारखे असतात, ज्याला कसल्याच मर्यादा नसतात , सहज मनात विचार आला एव्हढेच . भगवान के घर देर हैं अंधेर नही , त्यांनी केलेल्या पापाचे माप त्याला त्याच जन्मी भरावे लागले. त्याच्या वृद्धा अवस्थेत त्याच्या मुलाने म्हणजेच औरंगजेब ने त्याला त्याच्या हयातीत बंदिवासात टाकून साम्राज्य स्वतःकडे घेतले. मी मोघल साम्राज्याचा इतिहास लिहित नाही आहें, पण सहज त्या काळातील घटनांकडे पाहिले व लक्षात आले की ह्या प्रत्येक बादशहाचे कश्या न कश्यावर प्रेम होते, अकबरचे धर्म सहीष्णूतेवर, त्याने जोद्दन्बाई ह्या राजपूत स्त्रीशी विवाह तर केलाच, पण तिला हिंदू धर्माप्रमाणे पूजा अर्चनेची परवानगी पण दिली. एक गोष्टीचा मात्र उलगडा होत नाही, तो म्हणजे त्याचा सलीम-अनारकलीच्या प्रेमावर घेतलेला आक्षेप, कारण ती केवळ एक कनिज होती ? बाबरचे आपला मुलगा हुमायून ह्याच्यावर असलेले प्रेम हुमायून आजारी असताना , बाबरने अल्लाकडे आपले प्राण घेऊन मुलाला वाचवण्याची केलेली इबादत. औरंगजेब ह्याचे इस्लामवर असलेले प्रेम, त्याने इतर धर्मीय लोकांवर केलेले अत्याचार , ह्याची ग्वाही देतात. बहादूर शाह जफर ह्याचे शायरी वरचे प्रेम. " न किसीकी आंख का नूर हुं, न किसीके दिल का करार हुं , जो किसीसे के काम न आ सके मै वो एक मुश्तेगुबार हुं " ही त्याची नज्म आज पण आपल्याला ऐकावयास मिळते, व आवडते, जिंदगी जवळून पाहिलेल्याला ह्याचा खरा अर्थ खर्या अर्थाने कळतो. तर अश्या ह्या मोघलांच्या आग्रा ह्या पाक भूमीवर यमुना तीरी असलेल्या ताज महालच्या प्रांगणात आमच्या लग्नाचा ३३ वा वर्धापदिन आणि माझा ६२ वा वाढदिवस परीण्य्स गेस्ट हौस मध्ये अत्यंत प्रसन्न वातावरणात, पौर्णिमेच्या चांदण्यात , मित्र आप्तेष्टांच्या सोबतीत व खुमासदार जेवणाचां स्वाद घेत साजरा झाला. आम्ही उतरलेल्या गेस्ट हौसच्या मालकाने फुलांचा बुके , तसेच टेम्पोच्या driver ने आणलेला केक आणि लास्ट बट नौट लिस्ट म्हणजे सौ लड्डा व सौ गोंदिकर (पूर्वाश्रमीची देऊकुळे) ह्यांनी विद्याला केलेला गेट अप , खास लक्षात रहाण्या सारखे होते.

विद्या पंडित लग्नाच्या ३३ व्या वर्धाप्दिनी आग्रा येथे
ताजमहालचे प्रवेशद्वार
पौर्णिमेच्या रात्री चांदण्यात न्हाहलेला ताज पहाण्याची मजा कांही औरच. पिकते तिथे विकत नाही म्हणतात ना, तसे मला त्या रात्री भासले कारण, तेथे भारतीयान पेक्षा परदेसी प्रवासीच जास्त दिसले. तेवढ्या रात्री हजारो प्रवासी त्या कलाकृतीचे मनसोक्त दर्शन घेत होते. मला मात्र ताजच्या सोबत "जो वादा किया वो निभाना पडेगा, रोके जमाना चाहे रोके खुदाई हमको आना पडेगा" असे गुणगुणत हातात हात घालून फिरणारे शाहजहान व मुमताज बेगम चालत असलेल्याचा भास झाला. खरे तर बाहेर पडण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण रात्रीच्या दर्शनास वेळेचे बंधन असल्याने बाहेर पडावेच लागले. दिवस भराच्या सुखद घटनानचा आढावा घेत निद्राधीन झालो. सकाळी कांही मंडळी पुन्हा ताज दर्शनास पळाली, कांहीनी आराम केला. साधारण ११ च्या सुमारास, न्याहारी उरकून आम्ही फतेहपुर च्या दिशेने धाव घेतली. मोघलांचा, विशेषता अकबर कालीन घडामोडींचा आढावा घ्यावयाचा बाकी होता. आग्र्या पासून सुमारे ३० किलो मीटर वर असलेले फतेहपुर सिक्री हे प्रेक्षणीय स्थान बघण्याची उत्सुकता वाढत होती. फतेहपुर व सिक्री अशी ही दोन निराळी गावे होती, जी अकबराने एकत्र जोडली. फतेहपुर ही अत्यंत भव्य लाल रंगाची इमारत कलाकृतीचा उत्तम नमुना तर आहेच पण घ्या इमारतीच्या आवारात असलेली मोहम्मद सलीम चिस्ती ह्यांची संगेमरमरने बांधलेली कबर आकर्षणीय तर आहेच पण इबादत च्या दृष्टीने खास महत्वाची आहें. शहेनशा अकबर ह्याला तीन बेगम असूनही लग्नानंतर तेवीस वर्षांपर्यंत अपत्य नव्हते. अकबरने अजमेर दर्ग्या पासून फतेहपुर पर्यंत अनवाणी व उघड्या डोक्याने पायी प्रवास करून चिस्ती साहेबांची सेवा केली, ज्याच्या फलस्वरूप जोद्दन्बाई कडून त्याला जहांगीर ह्या पुत्राची प्राप्ती झाली. जहांगीर ह्याचे दुसरे नाव सलीम का , ह्याचा उलगडा येथे होतो. ह्या कबरीच्या भिंतीना असलेल्या जाळीला रेशमी धागा बांधण्याची येथे प्रथा आहें ज्या योगे तुमची मनोकामना पूर्ण होते असा लोकांचा विश्वास आहें. फतेहपुर ह्या इमारतीचा बुलंद दरवाजा हा भारतातील ऐतिहासिक वास्तूंच्या दरवाजातील सगळ्यात उंच दरवाजा आहें. ह्या आवाराताच एक भव्य मस्जिद आहें. ह्याच्या दुसर्या आवारात अकबराचा नवरत्न दरबार, दीवाणे आम आणि दीवाणे खास ह्या वास्तू आहेत. जयपूर हा पुढील टप्पा, आम्हाला वेळे अभावी बायपास करावा लागला. राजस्थान मध्ये पुलाला पुली म्हणतात, पुढील मार्गासाठी कोणाला विचारणा केली की, थोडी आगे पुली हैं , वहांसे बांये मोडो , उसके बाद बायपास लेना ,असे बहुतेक लोक सांगत, त्यामुळे पुढील प्रवासात पुली व बायपास हे दोन शब्द एवढे सरावाचे झाले की आम्ही प्रवासी एक मेकात हे शब्द गमतीने वापरू लागलो. नुकतीच प्रवासास सुरुवात झाली होती, रात्र थोडी व सोंगे फार अशी स्थिती होती (आमच्या सफरीचे एकूण दिवस कमी पण प्रेक्षणीय स्थळे खूप होती) बहुतेक प्रवासी साठीच्या वर्गातील असलेल्याने रात्रीचा प्रवास टाळणे आवश्यक होते, व कोठेतरी बायपास करणे जरुरीचे होते, तसेच चांगलासा थांबा पण. इस्लाम धर्माचा अनादर न करता, अजमेरच्या दर्ग्याला बाहेरून सलाम करून पुष्कर च्या दिशेने गाडी वळवली. रस्ता दुरुस्तीमुळे गाडीला गती घेता येत नव्हती, तरीही शक्य असेल तिथे गती घेवून रात्री ९ चे सुमारास, पुष्कर येथील क्रिश प्यालेस ह्या हॉटेलात दाखील झालो. छोटेसे गाव असूनही सोय बर्यापैकी होती. सकाळी 'पुष्कर' सरोवरात स्नानास जाण्यासाठी निघालो, हॉटेल पासून तसे सरोवर जवळ होते, पण टेम्पो पण रात्रीच्या विश्रांती नंतर आमच्या सेवेसाठी तत्पर होती. पुष्करच्या परिसरात पुजार्यांच्या सोबत अनेक माकडांनी आमचे स्वागत केले. ह्या पंड्यांशी कसे बोलावयाचे ह्याचा सराव असलेल्या माणसांनी काय ते योगदान ठरवले. स्नान करून तीर्थक्षेत्री होणार्या विधी उरकून ब्रम्हाच्या दर्शनास ब्रम्हा मंदिराच्या दिशेने दोन पायाच्या वाहनाने जाण्यास सुरुवात केली. पुष्करवर विधी करताना पंड्याने गोत्र विचारले, मी वसिष्ट गोत्राचे उच्चारण केले, सुरेशने पण तेच उच्चारण केले, मी म्हटले अरे तुझे गोत्र तू उच्चार, तो म्हणाला माझे गोत्र, वशिष्ट आहें, गम्मत म्हणजे पंड्याचे गोत्र पण वशिष्ट च होते गम्मत म्हणून सांगावेसे वाटले. संपूर्ण भारतात ब्रम्हाचे एकच मंदिर आहें, ते का आणि कसे ह्याच्या विषयी दुमत आहें, तेव्हा ते आता सांगून वाचकाना संभ्रमात न टाकणे बरे. पुष्कर ते उदयपुर खूप दूरचा पल्ला तर होताच पण मार्ग ही रुक्ष, हिरवळ तर औशधालाच, संगेमरमरचे डोंगर आणि त्याच्या वस्तूंची दुकाने मात्र मार्गावर टप्या टप्यावर दिसत होती. उदयपूरला पोहंचे पर्यंत संध्याकाळ होत आली, त्यामुळे हॉटेलवर न जाता, होतील तेव्हढी स्थळे बघून घेण्याचे ठरले. श्री हनुमंत गद्रे इथे नुकतेच येवून गेले असल्याने त्याना इथली बरीच माहिती असल्याचे दिसले. विजेच्या झगमटात उदयपूरचे सरोवर खूप दर्शनीय वाटले, हैदराबाद च्या ट्यांक बंड व लुम्बिनी पार्कचे combination असल्या सारखे मला वाटले, नजारा दर्शनीय होता त्यामुळे पटकन त्याला कॅमेर्यात टिपण्याचे काम गणेशने अचूक पणे केली. बर्याच वर्षांनी चना चोर गरम खायला मिळाले, त्याचा स्वाद घेत राणा प्रताप उद्यानाला भेट दिली, नंतर सखीयोन्की बाडी ह्या आगळ्या पद्धतीचे शॉपिंग सेनटर पाहून आधीच आरक्षित केलेल्या हॉटेल वर भोजन व विश्रांतीसाठी गेलो. राजस्थानी थाटात सजलेले ते हॉटेल जरी महागडे असले तरी बरे वाटले, एक तर तकिया लोडला टेकून दिवाणावर बसून बाम्बुन्च्या शेड मध्ये मंद उजेडात स्वादिष्ट जेवणाची मजा आगळीच होती, आणि दुसरे म्हणजे तेथून दिसणारा उदयपुर प्यालेस चा अद्वितीय नजारा वाह क्या बात. माझी मानलेली बहिण निमाताईची मुलगी व जावई येथे असतात, दुसरे दिवशी सकाळी ते उभयता आम्हाला भेटण्यास हॉटेलवर आले, व येताना आमच्यासाठी तेथील स्पेशल गरम जिलेबी आणण्यास विसरले नाहीत. बरे वाटले, आजच्या धावत्या युगात जेथे रक्ताची नाती सुद्धा , नाती दाखवताना कचरतात त्या युगात जोडलेल्या नात्याची जाणीव ठेवणे विशेष वाटले. चहापाणी झाले व नंतर आम्ही उदयपूरच्या प्यालेस बघावयास बाहेर पडलो. उदयपुर palace एक अप्रतिम राजवाडा /वस्तू संग्रहालय म्हणा ना. ' राजस्थान ' कलाकुसरी साठी प्रसिद्ध असलेल्या ह्या प्रांतात वसलेला हा राजवाडा म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. प्रवेश द्वारात स्वागतास व मदतीस असलेले राजस्थानी वेशातले दारोगाजी, विदेशी पर्यटक, गाईड सगळे बघत राजवाड्याच्या प्रांगणात आलो. तल्लख व विनोदबुद्धी गाइड ने प्रथम उदयपूरच्या सर्व सविस्तर इतिहास विषयक घटनांची माहिती सांगितली आणि मग आम्हाला वास्तू बघण्यास घेवून गेला. त्या राजवाड्याच्या पांच मंजीली चढणे आम्हा उभयताना शक्य नव्हते व त्यामुळे कदाचित आमच्या सह प्रवाश्याना विलंब होण्याची दाट संभावना होती, म्हणून आम्ही मागेच राहून परिसरातील बाग, राजस्थानी पेहराव घालून फोटो काढणे, कलाकुसरी च्या वस्तूंची असंख्य दुकाने पाहण्याची मजा मनसोक्त लुटलीच, शिवाय दोन मजल्या पर्यंत चढून राजवाडाही पाहाण्याचे नेत्र सुख पण, तसेच कुणाला विलंब न करता. श्री लड्डा ने विद्याला राजवाड्याच्या पायर्या उतरण्यास केलेली मदत नमूद करावीशी वाटते. जवळच असलेले शंकराचे मंदिर पाहून अम्रीत्सर्च्या दिशेने प्रस्थान केले. हैदराबाद आंध्र प्रदेशहून निघून, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, युनियन teriotery , उत्तर आंचल, व राजस्थान पार केल्यावर आमचे डोळे सुजलाम सुफलाम आणि माझा अत्यंत आवडता, पंजाब कडे लागले. म्हणतात ना "जो मजा इंतेजार मे हैं , वो दिदारे यार मे नही", तसे कांहीसे आमचे झाले. उदयपुर ते अम्रीत्सर खूप लांबचा पल्ला होता, त्याशिवाय रस्ता दुरुस्ती गतिरोधक बनले. रात्री ८ वाजले तरी आम्ही अजून राजस्थानच्या परिसरातच होतो त्यामुळे दिदारे पंजाब त्या दिवशी होणे शक्य नव्हते आणि इंतेजार करणे जरुरी होते, तसेच विश्रांती करीता थांबा घेणे आवश्यक होते. फार पुढे जाण्यात तथ्य नव्हते, एक तर निर्मनुष्य रस्ता, तो ही खडतर व प्रवासी पण अगदी नौजवान ! राजस्थानच्या सीमेत असल्याने संगम रवराने आमची साथ सोडली नव्हती. 'मकराणा मार्बल सिटी' ह्या छोट्या टाऊन मधील कोहिनूर प्यालेस ह्या मार्बलने सजवलेल्या हॉटेलचा रात्री साठी सहारा घेतला. कोहिनूर नावावरून मालकाचा धर्म लक्षात आला, पण चविष्ट शाकाहारी जेवण तर मिळालेच व मेहमान नवाजी पण तारीफे काबील , हॉटेल व्यवस्थापकाला दुसरे दिवशी खुदा हाफिज म्हणताना ओठावर शुक्रिया हे शब्द सहजपणे आले. माकराना मार्बल सिटी, नाव भारदस्त व छान वाटले, मार्बल सिटीचा मार्बल मागे पडत होता, लवलवत्या पात्यांची हिरवीगार शेते, क्यारीयोमे बेहता नेहर का पानी, आपल्या लाडक्या जगजीत नाहीतर मनजित कौरला क्यारिअर्वर बसवून पुत्तर पर्मितेला दांडीवर घेवून सायकलवरून जाणारे सरदारजी, पंजाब जवळ आल्याची चाहूल देत होते. रस्त्यात परांठे, लस्सी इत्यादी वस्तू पोटात रिचवत रात्री ८ चे सुमारास अम्रीत्सरला पोहोंचलो. इथे आल्यावर वाटले की, जो मजा इंतेजार मे था, उतनाही दिदारे पंजाब मे हैं ,केव्हा एकदा सुवर्ण मंदिरात जातो असे झाले होते, थांब्या साठी कोठल्या हॉटेल वर जावे ह्याची चर्चा करण्यात थोडा वेळ अनर्थक गेला, शेवटी एका नवीन व आधुनिक होटलचा ताबा घेतला. सामान रूम मध्ये पटकले, फ्रेश झालो, व मंदिराकडे धाव घेतली. मी, विद्या,गणेश,सुरेश व श्वेता अशी आमची व्हील चेअर वाली टीम कासवा प्रमाणे मागे होती, बाकी सश्यांची टीम पुढे दौड मारत गेली, पण तेच झाले जे कासव आणि सश्याच्या बाबतीत. आम्हाला ग्रंथ साहिबाचे दर्शन मिळाले, पण दुसर्या टीमला फक्त मंदिराचा परिसर. मला ह्याचा आनंद झाला असे मी म्हणत नाही, सहजच ससा आणि कासवाच्या गोष्टीची आठवण झाली इतकेच. देवळाचे विशाल आवार, स्वच्छ तलाव, अखंड कार सेवा करणारे असंख्य पंजाबी, अगदी लहान बालकापासून ते शंभरीचे म्हातारे, पाहून खूप नवल वाटले , आम्हाला पण थोडी सेवा केल्यावाचून पुढे जाणे जमले नाही.'लंगर' शीख लोकांचे, शब्दात बयान न करता येण्या सारखे सेवा भावेने ओतप्रोत असे अन्नछत्र, कोठेही देणगीची मागणी नाही सगळीकडे स्वच्छता, शांतता व भक्तीने ओथंबलेल्या धुंद वातावरणात कानावर पडणारे' "शबदचे" सुरेल स्वर, पावलानाना जागीच खिळून ठेवतात , की पुत्तर म्हणून मदतीचा हात पुढे करणारे सरदारजी पाहून मन भरून आले. लन्गरचा लाभ घेवून, हॉटेलवर परतलो. दुसर्या दिवशी सूर्यप्रकाशात सुवर्णमंदिराचे सौंदर्य बघण्यास गेलो. रात्री दिव्यांच्या रोशनाइत झगमगणारे तलावाच्या पाण्यात प्रतिबिंबित सुवर्ण मंदिर जेवढे आकर्षक वाटले, तेवढेच सूर्यप्रकाशात पण ते तेजस्वी व नेत्रदीपक भासले. प्रसाद रुपात दिलेला साजूक तुपात भिजलेलां हलवा दोन तीन वेळा ग्रहण करून, आवारात निवांत पणे मंदिराचा परिसर परीक्षण करत मनोमन शीख धर्मीय लोकांचे स्वधर्म प्रेम, त्यासाठी घेतलेली मेहनत व धडपड ह्याचे कौतुक करत लंगरवर पोहोंचलो. दिवस रात्र चालणार्या ह्या लंगरचे प्लानिंग कसे करत असतील, कोठे गोंधळ नाही, गडबड नाही, कसली कमतरता नाही, खरेच वाहे गुरुंची कृपा आहें. माझा तरी पाय तिथून निघत नव्हता, पुन्हा इथे येण्याचा निश्चय करूनच तेथून बाहेर पडलो. त्याग्याचे प्रतिक, देशासाठी प्राण अर्पण करण्यास सज्ज असलेल्या ह्या अम्रीत्सर मध्ये इंग्रजाने केलेला भीषण अत्याचाराचे निशाण जालियानवाला बाग बघून त्या प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर दिसू लागले र्हदय हादरल्या सारखे झाले. किती निष्पाप लोकांच्या प्राणाची आहुती इथे दिली गेली, त्या घटनेला शतक होत आले, पण त्या वास्तूत फिरताना मन भरकटून जाते, पण................? शेवटी ह्या गोष्टीना undo करता येत नाही हे कटू सत्य पचनी पाडावे लागते. वाघा बोर्डर, सफरीतले पुढचे स्थान, ह्या स्थानाला मी प्रेक्षणीय स्थळ कधीच म्हणणार नाही, भले ते प्रवेशद्वार, तो परिसर, तिथली ती परेड बघण्या लायक असेल, पण तिथे कोठल्या प्रकारचे पावित्र्य नक्कीच नाही. असंख्य लोकांच्या प्राणांची आहुती देऊन मिळवलेल्या स्वतंत्र भारताचे हिंदुस्थान व पाकिस्तान असे दोन भाग केलेले दोन देश, एकाच धरतीचे दोन भाग, व गेट पासून केवळ २० किलो मीटरवरचे लाहोर ज्याने आमच्या हिंदी चित्रपट सृष्टीला असंख्य कलाकार, निर्माते दिले ते पाकीस्थानात, आणि गेटच्या ह्या बाजूस हिंदुस्थान. असो जशी माणा विलेजला नेपाल बोर्डर पाहिली, रोहतंग पासला चीनची बोर्डर पाहिली तशी इथे पाकिस्तानची , म्हणजे अजून एक दुसर्या देशाची बोर्डर पाहिल्याचे समाधान मिळाले इतकेच. ' चलो बुलावां आया हैं, माता ने बुलाया हैं ' माता वैष्णोदेवीच्या बुलाव्याने गाडीने कत्राचां मार्ग सिधाराला. घाट रोड, आजूबाजूचे नैसर्गिक सौंदर्य बघून केदार यात्रेची आठवण झाली. गाणी,भजने गुणगुणत, देवीचे स्मरण करत, रात्री १० चे बेतास कटरा गाठले. नेहमीच्या सरावाने रहाण्याची सोय केली, चविष्ट जेवण घेतले, व दर्शनाच्या चौकशीस सुरुवात केली, कोणी, डोलीची, कोणी helicopter ची, कोणी एन्ट्री तिकीटाची जुळवाजुळव करण्यास बाहेर पडली. अनेक निरनिराळे प्लान्स आखले, रात्री १ चे सुमारास सर्व ट्रेक चढण्यास सज्ज झाले, पण दुर्दैवाने प्रवेश पर्चीची वेळ टळून गेली होती, सकाळी लवकर उठून पुन्हा सर्व दर्शनाच्या तयारीस लागले, helicopter मिळण्याची शक्यता नव्हती. आम्ही सर्व आटो करून ट्रेक वे कडे धाव घेतली. मा का बुलावा आला नव्हता , वर जाण्याचे कोठलेही साधन उपलब्ध नव्हते, त्यामुळे खालूनच देवीला वंदून जड अंतकरणाने पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले, देवीपूजा झाली नाही तरी पोटपूजा करणे जरुरी होते, उतारवयातील अलंकार (बी पी , शुगर) बहुतेकांकडे होते व त्याच्या निर्मुलना साठी पोटपूजा.
'हर चेहरा यहा चांद तो हर जर्रा सितारा, ये वादिये कश्मीर हैं जन्नत का नजारा' १९६० ते १९७० हिंदी रंगीत चित्रपटाचा सुवर्णकाळ , ह्या काळातील अनेक चित्रपटातून पाहिलेले जन्नते कश्मीर प्रत्यक्ष पाहण्याचे वर्षानुवर्षे उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली होती. मा वैष्णोदेवीच्या न झालेल्या दर्शनाने निराश झालेल्या मनाने पुन्हा कश्मीर दर्शनाच्या आशेने उभारी धरली. घाट रोड , सौंदर्य सृष्टी टिपत श्रीनगर च्या दाल लेक सीमेवर केव्हा पोहोंचलो कळालेच नाही. टेम्पोतून उतरलो, दृष्टिगोचरात दुसर्या किनार्यावर फक्त एका पेक्षा एक सुंदर हौस बोट्स दिसत होत्या. रस्त्याच्या उजव्या बाजूस आधुनिक हॉटेल्स. इक्बाल, ज्या हौस बोटच्या मालकांनी आमच्यासाठी बोट्स आरक्षित केल्या होत्या, तो आमचे स्वागत करण्यास अदबीने उभा होता. टिपिकल काश्मिरी उर्दूत संभाषण करत त्याने त्याच्या साहायाकान सोबत आम्ही व आमचे सामान उतरवून दोन शिकार्यामध्ये बसवले व आम्ही हौसबोट कडे सियाहीमध्ये (अंधार) जाण्यास सुरुवात केली, आम्ही शिकार्यात बसलो व वीज गेली. आम्ही हौस बोटीत पाउल ठेवले व पाठोपाठ विजेने, त्यामुळे प्रथम दर्शनी बोटीच्या नजार्याचा आनंद द्विगुणीत झाला. थोड्या दडपणाखालीच तेथे प्रवेश केला, कारण बर्याच जणांनी बोटीवर रहाणे कसे धोकेदायक ह्याचे वर्णन केले होते, पण आम्ही अनुभवलेला ३ दिवसांचा स्टे म्हणजे एक अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय , पुन्हा अनुभवा असा अनुभव होता. इक्बाल व त्याच्या सार्या कुटुंबीयाने केलेली चोख सोय एकदम दिलखुश करणारी. 'जब जब फुल खिले' ह्या चित्रपटात हौस बोटचे भरपूर चित्रीकरण होते, पण त्याचा उपभोग घेतल्या शिवाय त्याची मजा समजत नही. प्रत्येक सोयीनी युक्त अश्या ३ बेड रूम + ड्राइंग +डाइनिंग असलेल्या त्या बोटीवर मिळणारे भोजन इतके अप्रतिम होते की, क्या कहने. उद्या काय करावयाचे , हे विचारून नाश्ता व जेवण तयार केले जायचे , काश्मिरी पलाव, सोजी व सुक्या मेव्याचां हलवा, तसेच कोखा हा काश्मिरी चहा हे तर मिळालेच पण आश्चर्य म्हणजे कांदे पोहे व उपमा पण त्याने देऊ केला .
रात्री हौस बोट मध्ये थोडेसे टेन्स व थोडे कुतुहूल मिश्रीत भावनेने झोपेचा सहारा घेतला, टेन्स अश्यासाठी कि अनेकांनी मनात भरवलेली भीती, व कुतूहल असे कि, जल लहरींवर राहायाची ही पहेलीच वेळ, त्यात ते लाकडी सुंदर सुबक घर. दुसरे दिवशी सकाळी निवांत उठलो, नाश्ता केला ,उबदार कपडे घालून तयार झालो, व इक्बाल च्या सांगण्या नुसार दाल लेकची सफर करण्यास सुंदरश्या शिकार्यात बसलो, दाल लेक मधील तीन तासांची सैर म्हणजे अद्वितीय , चहूकडे पाणी, समोर नजर पोहन्चेल तिथपर्यंत नीले पर्बतों की धारा, लेक मध्ये चोहीकडे शिकार्यातून फिरणारे पर्यटक त्यांच्या खिदमतीत शिकार्यातून आकर्षक वस्तू विकत फिरणारे विक्रेते, काश्मिरी ड्रेस घालून फोटो काढण्यासाठी गळ घालणारे फोटोग्राफर, फळे व इतर खाद्य पदार्थ घेऊन ग्राहकास खाण्यास उत्सुक करणारी मुले, सगळे कसे आगळे वेगळे होते. तब्बल तीन तास दाल लेकची सफर करून लेक मधीलच साड्या व कपड्यांच्या दुकानात शॉपिंग साठी गेलो, बर्याच जणांनी विंडो शोपिंगच केले, अस्मादिक मात्र कनुकू सिल्कच्या ११ साड्या, अर्ध्या तासात घेऊन मोकळा . दाल लेकची सैर संपवून, शंकरचार्यांच्या देवळास जाण्यास निघालो, २२० पायर्या असलेले हे देऊळ, ऐक शांततेचे चिन्ह आहे. चिनार व देवदार वृक्ष्यांचा परिसरात वळणा वळणाच्या रस्त्याने देवळा पर्यंत पोहचण्याचा मार्ग आल्हादायक भासला. श्रीनगर मध्ये फिरताना प्रत्येक ठिकाणी कोठल्या न कोठल्या चित्रपटाचे चित्रण झाल्याचे गाईड सांगत होते , त्यामुळे कल्पनेने आम्ही त्या त्या नायक नायीकाना गाणी गात फिरताना बघत होतो. गम्मत वाटली. देवदर्शनानंतर उरलेल्या सबंध दिवसात निरनिराळ्या गार्डन्स बघण्याचा बेत होता. शालीमार , मोघल जन्नत अश्या निरनिराळ्या गार्डन्स बघेस्तोवर संध्याकाळ झाली . गार्डन्स जरी एकापेक्षा एक असल्या तरी , कश्मीर मध्ये कांही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचे पडसाद आजही बघावयास मिळतात , कोठेतरी ही स्थाने दयनीय वाटतात, ह्या सुंदर बगीच्यांच्या जोपासनेत नक्कीच कमतरता असल्याचे जाणवते. विशेषता शालीमार ही जहांगीर बादशाहाने बांधलेली गार्डन फारच दुखी, विस्कटलेली, , निराशजनक व मुर्झाइसी वाटते. ज्या गुलाबाचे ताटवे चिनार, देवदार वृक्षांची मेजवानी हिंदी चित्रपटातून अनुभवली आहे, ती प्रत्यक्षात तेवढी आढळली नाहीत, पर्यटक आहेत, पण त्यांची गर्दी नाही, फर्लांगा फर्लांगावर असलेले आर्मीचे जवान जरी सुरक्षेतेतीची जाणीव देत असले तरी केव्हा कांहीही होऊ शकते अश्या विचारांचे दडपण मनावर क्षणेक का होईना येते हे सत्य नाकारता येत नाही. पण कांही म्हटले तरी जन्नत ए कश्मीर जिवनात एकदा तरी अनुभवावे हे खरे. गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम नावे उच्चारायला सुद्धा किती छान वाटते, अश्या ह्या गुलमर्गला गुलाबी थंडीत, निसर्ग रम्य वातावरणात कोठे टेकडीवर , कोठे झाडीत तर कोठे प्लेन रस्त्यावर तीन तास घुड सवारी म्हणजे आयुष्यातली एक गोड व अविस्मरणीय घटना म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. घोड्यांच्या चालकांनी आम्हाला मिशन कश्मीर चित्रपटाचे चित्रीकरण झाले त्या स्पॉट वर नेऊन स्व खर्चाने चहा पाजला, चहा पीता पीता त्यांच्यांची झालेल्या गप्पांच्या ओघात एक दर्दनिय सत्य समोर आले, ते असे की जेव्हा कश्मीर मध्ये दंगे फसाज चालले होते, तेव्हा पर्यटकांच्या अभावी ह्या लोकांची कशी उपासमार झाली, किती कुटुंबे उध्वस्त झाली, व ज्यामुळे त्या समाजातील युवक कसे वाईट कामे करण्यास प्रवृत्त झाले, सर्वच करुणास्पद होते. आज परिस्थिती बदललेली आहें, ह्या लोकाना पुन्हा कामे मिळत आहेत, प्रवाशांकडून छोट्या छोट्या इनामाची ते अपेक्षा करत असतील, तर त्यात मला तरी कांही गैर वाटले नाही, शेवटी माणुसकीची जाण ठेवून आपण मुठ थोडी मोकळी केली तर समाजात होणार्या कुकर्माना आळा घालण्यात आपण कांही तरी केल्याची जाणीव नक्कीच समाधान देईल. गुलमर्ग दृष्टीत भरून परतताना सफरचंदाच्या बागा पाहिल्या, एरव्ही आपण ठेल्यावर विकावयास आलेली सफरचंद घेतो, पण इथे ताजी ताजी झाडावरची सफरचंदे तोडून खाण्याची मजा कांही आगळीच, हस्तकलेच्या दुकानात काश्मिरी पेहराव घेतला, सुक्या मेव्याच्या दुकानात आक्रोड, बदाम इत्यादीची खरेदी झाली, सुका मेवा आपल्याकडे पण मिळतो, पण इथून आणलेल्या मेव्याची चव न्यारीच. संध्याकाळी ७ चे सुमारास दाल लेकच्या किनार्यावर पोहोंचलो, एक टीम हौस बोटकडे वळाली, आमची संथ गती टीम कलाकुसरींच्या वस्तू खरेदी करीता मागे रेंगाळली. बोटीवर गेलो तर खास काश्मिरी मेनू जेवणाच्या टेबलावर आमची आतुरतेने वाट पहात होता, आम्ही पटकन फ्रेश होऊन त्या मेनूला न्याय दिला. आज बोटीवरची शेवटची रात्र असल्याने, जरा जास्तच वेळ गप्पा मारल्या, बोटीत उगीचच इकडे तिकडे फिरलो व मग निद्राधिस्त झालो. दुसरे दिवशी सकाळी ९ चे बेतास तयार होऊन कांदे पोह्याचा नाश्ता, कश्मीरी चहाची चव घेतली व ओलसर डोळ्यांच्या कडांनी इक्बाल परिवार आणि त्या मूक हौस बोटचा निरोप घेतला, सामान व आम्हाला शिकार्यात बसवून पैल तीरावर सोडण्यास इक्बाल आला, कांही चूक भूल झाली असल्यास क्षमेची याचना केली व पुन्हा येण्याचे मनपूर्वक आमंत्रण देऊन नवीन प्रवाश्यांच्या अतिथ्यासाठी शिकार्यात बसून हौस बोट्कडे वळला. आम्ही टेंपोत आपापल्या सीटचा चार्ज घेतला. खूप दूरचा पल्ला गाठावयाचा होता गाडी गती घेत होती, श्रीनगर मागे पडत होते, मन गेल्या १५ दिवसातील घटनांचा आढावा घेत होते. सुखद क्षण चेहर्यावर हसू आणत होते, कांही ज्या छोट्या अप्रिय घटना झाल्या त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अर्थक असूनही मन गप्प बसत नव्हते. विनोदबुद्धीने सगळ्याना सतत हसत ठेवण्याचा सुरेशचा यत्न नक्कीच वातावरण प्रसन्न करत होते, लड्डा सुद्धा त्यांच्या परीने साथ देत होते. अनंतनाग ह्या भागातून फिरताना मैलो न मैल रस्त्याच्या कडेलां पसरलेली केशराची शेती आयुष्यात प्रथमच पाहिली, ती ही शेतात उतरून , तेथील ताज्या केशराच्या डब्या घेण्यास कोणीच चुकले नाही, जरी फुले तोडणे हा गुन्हा आहें , तरी एक दोन फुले संग्रही ठेवण्यासाठी तोडण्याचा गुन्हा केल्यावाचून राहाववले नाही. श्रीनगर ते जम्मू २४० किलो मीटर्सचा पूर्ण रस्ता घाटातून व नागमोडी वळणांचा आहें , गाडी अत्यंत मंद गतीने जात होती,आणि तश्यातच घाटात एक अपघात झाल्याने पुढील मार्ग तात्पुरता बंद झाला होता, रस्ता मोकळा होण्यास किती वेळ लागेल ह्याची कल्पना नव्हती, रात्रीच्या जेवणाची वेळ होत आली , यक्ष प्रश्न होता पण उत्तर नव्हते . आसपास तीन तासानंतर रहदारीला सुरुवात झाली, घाट उतरताच एक अलिशान पंजाबी धाबा नजरेस पडला, पोटात इंधन घालणे अत्यंत आवश्यक होते, धाब्याची सजावट जेव्हढी चांगली होती तेव्हढीच सर्विस पण आणि जेवण सुद्धा, देर से संही पण सगळ्यांनी यत्छेच भोजन केले. दिल्ली अजून फार दूर होती व मर्जीविरुद्ध सुद्धा रात्रीचा प्रवास करणे अत्यावशक होते, नाहीतर दुसर्या दिवशी दिल्ली गाठणे मुश्कील होते. diver सोबत आळीपाळीने सुरेश, मी व लड्डा जागे होतो, बाकी प्रवाश्याना तरी झोप मिळावी हा सुउद्देश. जीतूची खरेच शर्थ होती, जल्लंधर, पठाणकोट, लुधियाना, पटियाला अशी पंजाब मधील एक एक स्थाने पार करण्यात निशांत झाला. प्रात: विधी, स्नान इत्यादी साठी अम्बाला येथे हॉटेल मध्ये उतरलो. रात्री ८ ला दिल्लीहून हैदराबाद ची फ्लाईट असल्याने ७ पर्यंत विमान तळावर असणे जरुरी होते. अजूनही २०० किलो मीटर्स ची दुरी पार करावयाची होती. रस्ता दुरुस्तीने आमची पाठ सोडली नव्हती, चलते चलते कुरुक्षेत्राचे धावते दर्शन घेऊन, सात वाजता विमानतळ गाठले. कांही प्रवाश्यांसाठी विमान प्रवासाचा हा पहिलाच अनुभव असल्याने अपेक्षित विलंब कन्फ्युजन झाले, पण सरते शेवटी सर्व व्यवस्थित पणे बोर्ड झाले, ठराविक वेळेस विमानाने उड्डाण घेतली व षडूल वेळेवर शमशाबाद विमान तळावर ल्यांड केले. श्रीनगर पासून दिल्ली विमान तळा पर्यंतच्या प्रवासाने थकलेले प्रवासी केवळ दोन तासात दिल्ली हैदराबाद प्रवास संपल्याने खुश व उल्हासित झाले, एकमेकांचे निरोप घेवून सर्वांनी आपापल्या घराचा मार्ग पत्करला. ह्या प्रवासातील एक विशेषता म्हणजे सौ देऊकुळे , सुरेश व मी १९५४ ते १९५९ साला पर्यंत असलेले वर्ग मित्र एकत्र आलो, ह्याला कपिला शस्ठीचा योगच म्हटले पाहिजे. प्रवासात निवडक प्रवाश्यांच्या क्षुल्लक कारणास्तव घडलेल्या कांही अप्रिय घटनांमुळे सफरीतील गमती जमतीला जरी गालबोट लागले, तरी एकंदर सफर यशस्वी झाली. आज ह्याला दोन महिने होत आले, ह्या अप्रिय घटनां मागच्या कारणाचे विश्लेषण करता , मला आजही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, पण एक गाण्याचे बोलं मात्र मला भेडसावतात " कळेना अजुनी माझे मला असा मी काय गुन्हा केला" असो- 'never give up ' ह्या तत्वानुसार पुढील, म्हणजे नेपाळं ट्रीपच्या तयारीस मी लागलो आहें आमच्या ह्या आगामी सफरीत येवू इच्छुक सभासदांचे हार्दिक स्वागत