जात्यावर दळण्यास बसले की ओवी सुचते म्हणतात , तसे लिहावयास बसले म्हणजे शब्द आपल्या भोवती फेर धरून नाचावयास लागतात, त्यातील योग्य शब्द योग्य जागी बसवण्याचे काम लेखणी आपोआप करावयास लागते, आणि हे सगळे व्यवस्थित झाल्यास उत्पत्ती होते ती वाचनीय लेखनाची. माझ्या पहिल्या आपत्याचे (दोन धाम प्रवास वर्णन) खूप कौतुक झाले, सर्वांनी त्याला ओंजारले, गोंजारले ज्यायोगे त्यांनी चांगले बाळसे धरले, थोडक्यात म्हणजे सर्वांनी ते वाचले व सुंदर टिपण्या दिल्या. आता माझे दुसरे आपत्य द्वारका व सोमनाथ यात्रा वर्णन रूपाने जन्म घेवू पहात आहें .
आपले प्रत्येक अपत्य सुंदर,हुशार व लोभस असावे असे प्रत्येकाला वाटते पण ते तसे असेलच असे शास्वतीने सांगता येत नाही योग्य अलंकार उपमांचे लेणे लेववून त्याला आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहें . त्याला उचलून धरणे त्याचे लाड करणे अथवा त्याला नावे ठेवणे हे सर्वस्वी माझ्या वाचकांच्या हातात आहें.
" राकट देश्या कणखर देश्या , दगडांच्या देश्या " असे महाराष्ट्रा विषयी म्हणताना छाती अभिमानाने जेवढी फुलते, तेवढीच एके काळी महाराष्ट्राचा विभाग असलेल्या गुजरात विषयी " सपक देश्या, ढोकळ्याच्या देश्या, झेन्ड्यांच्या देशा " असे म्हणताना अवलंब विलंब करताना रामदेव बाबांचे पोट जेवढे आत जाते , तसे कांहीसे होते. मी देश, भाषा किंवा प्रांत द्वेष्टा नाही, वास्तविकता मला पंजाब, म्हणा नाहीतर बंगाल म्हणा महाराष्ट्रा एवढाच आवडतो. तसेच गुजरात जिसे प्यार से लोग कहते है गुजू मला आवडत होता, पण माझ्या अपेक्षा ह्या प्रान्ताकडून कदाचित जास्त असतील आणि प्रत्यक्षात तसे अनुभवायास मिळाले नाही म्हणून अपेक्षा भंगापोटी माझे असे मत झाले असेल, किंवा नुकत्याच झालेल्या केदार यात्रेमुळे, माझ्या दृष्टीने केदार हा बेंचमार्क ठरला असेल आणि त्या तुलनेत तफावत झाल्यामुळेही असेल कोठेतरी कांहीतरी उणीव भासली हे खरे.
गुजरातला मी सपक का म्हणालो, तर तेथील समाज, जेवण रस्ते, (तीर्थस्थाने वगळल्यास) इतर भागात चैतन्य, उल्हास, जोश, दमदारपणा आढळला नाही, जेवण मग ते धाब्यावर असो, नाहीतर कोणाच्या निवासी, हॉटेल मध्ये नाहीतर अन्नछ्त्रात, भाजी आमटी सारखे चमच्यांनी ढोकळे वाढतात , म्हणून मला गुजरातला ढोकळ्यानच्या देशा म्हणावे वाटले. शेवटी पण महत्वाचे म्हणजे झेनड्याच्या देशा, इथे, देऊळ, घर, चौक, बोटी , सगळ्यांवर झेंडे रोवलेले दिसतात, कोठे भगवा, कोठे लाल, कोठे पांढरा, तर कोठे हिरवा (ज्या शिवाय आमच्या नेत्यांचे चालत नाही, व जो आमचा पिच्छा जन्मभर सोडणार नाही) असे असंख्य झेंडे दिसतात, म्हणून मला ही कल्पना सुचली. आजच्या महागाइच्या काळातही मी नमनाला येव्हढे तेल लावलं आहें, ते माझा अनुभव जास्तीत जास्त मोकळेपणाने मांडण्या साठी. असो
मी व लड्डा परिवार सोबत प्रवासाला जाणे ,आणि गाडी लेट होणे, हे समीकरण आता a2 - b2 = (a + b ) (a - b ) ह्या समीकरणा सारखे पक्के झाले आहें. ह्या यात्रेत लड्डा परिवारातील १७ जणापैकी कोणी कुणाचा मामा तर कोणी काका, कोणी आजी, कोणी मेहुणा कोणी भाऊ एकंदरीत तो परिवार म्हणजे मिक्षड vegetable पलाव होता , तर आम्ही चौघे (मी, गणेश, विद्या व श्वेता ) त्याच्या सोबतच्या चटणी सारखे. एकंदर १२ बायका , ७.५ पुरुष अशी आमची टीम होती. गेल्या यात्रेत गाडी ७ तास लेट होती, तर ह्या प्रवासात ती ८ तास लेट . सोलापूर पर्यंत गाडी वेळेवर होती, आम्ही नंतर निद्रिस्त झालो, सकाळी डोळे उघडले तर, अन्काइचा अंगुठा पर्वत आम्हाला वाकुल्या दाखवीत होता. माझे आजोळ नासिकला असल्याने लहानपणा पासून ह्या मार्गावर बरेचदा प्रवास केलेला, म्हणून हा पर्वत परिचयाचा. पण राजकोटची गाडी ह्या मार्गावरून जात नाही, त्यामुळे, हा अन्काइच्या पर्वताचा दुरावलेला जुळा भाऊ गुजरात मध्ये असावा असे मला वाटले. पण दुर्दैवाने तो अन्कैचाच पर्वत होता, मुंबई मार्गावर कांही दुर्घटना झाल्याने आमच्या गाडीचा मार्ग रात्रीत कोठे वळवून मनमाड मार्गे घेण्यात आला होता. मग काय around the world in eight dollars म्हटल्या प्रमाणे त्याच तिकिटावर आम्हाला भुसावळ, जळगाव सूरत हे सगळे दाखवत रात्री ८ चे जागी दुसरे दिवशी पहाटे ४.३० ला राजकोटला पोहन्चाविले . स्टेशन वर जीत नावाच्या गुजूभाइने आम्हाला रिसीव्ह केले . हा आमच्या टूरचा संचालक होता, त्याने बाहेर आल्यावर आमच्या यात्रेच्या रथाचा सारथी (driver) दिलावर ह्याच्याशी ओळख करून दिली, मग तो दिलावर हुसेन का खान हे मी विचारले नाही, पण दिलावर नावात जो भारदस्तपणा आहें, तो त्याच्यात कोठेही दिसला नाही, तो सुतकी चेहर्याचा, कृष, लेंगा व सद
र्यातील haa इसम काय गाडी चालवणार असे मला वाटले, पण त्यांनी माझ्या ह्या विचारला गाडी उत्तम प्रकारे चालवून तडा दिला.त्याचा साथी किंवा किन्नर म्हणा मुकेश हा आपल्या चेहर्याची घडी विस्कटू नये म्हणून फारसा बोलत नव्हता. ह्याचे काम होते दारात उभे राहणे व गाण्याच्या सी डी लावणे मुकेश नावाच्या ह्या इसमाकडे मुकेश सोडून इतर गायकांच्या सी डिज होत्या. आम्ही राजकोट च्या युरोपा इन होटल वर गेलो. होटल खूपच आकर्षक होते. आंघोळी, पांघोळी आवरून complimentary breakfast यत्छेच खाऊन, द्वारकेच्या दिशेने प्रयाणास सुरुवात केली.
स्मशान भूमी हे एक प्रेक्षणीय स्थळ असू शकते, हे जामनगरचे प्रेक्षणीय स्मशान वाटिका पाहिल्यावर कळले. येथे राम सीता, शबरी, श्रावण बाळ, लव कुश रबिन्द्रनाथ टागोर, संत तुकाराम इत्यांदींचे सुंदर अगदी जिवंत भासणारे असे पुतळे आहेत, सुंदर व आकर्षक बगीचा, अस्थी भरलेली व्यवस्थित पणे लावलेली मडकी, सतत चालणारा मंत्रजागर, आणि ह्या भूमीचे दर्शन करावयास आलेल्या प्रवाश्यांचा आवाज ज्यामुळे इथे स्मशान शांतता वगेरे भासत नाही. बाहेर कांही आकर्षक वस्तू विकणारे विक्रेते, एकंदर दृश्य आगळेच. जीवनाच्या शेवटी जिथे सर्व जातात, तेथून आमच्या यात्रेची इफ्तेदा झाली, अंजाम काय होईल ह्याचा विचार करत पुन्हा पुढील प्रवासा साठी बस मध्ये विराजमान झालो.
जामनगर ते द्वारका साधारण ३ ते ४ तासाचा प्रवास, Reliance चा कारखाना सोडल्यास रस्त्यात फारसे कांही बघण्यासारखे नाही,तसे येथे गिरण्या बर्याच आहेत पण देखण्या लायक नाहीत . रस्त्यात तुरळक वाहतूक, दूर दूर पर्यंत कोठली गावे नाहीत. मला वाटले होते बांधणी साड्यातील, उलटा पदर घेऊन, केम छे, मजा मा किंवा सारो छे म्हणत जाणार्या, गोर्या, आशा पारेख सारख्या शरीरयष्टीच्या कांताबेन, सुशीलाबेन कस्तुरबा दिसतील, पण निराशा पदरी पडली.
रस्त्यातील घरे दुर्मुसलेली वाटली compound च्या भिंती पाहून मला, लग्नात सुनेच्या माहेरहून नीट मानपान न झाल्यावर रुसलेल्या विहिणीच्या चेहर्याची आठवण झाली. रंगसंगतीचे गणित म्हणाल तर ते कोठेच दिसले नाही, घर काय , दवाखाना काय, हॉटेल काय अन होस्टेल काय गुलाबी आणि निळ्या रंगाचे combination . आपण आपल्या अवती भवती पाहतो की, कांही लोकांकडे भरपूर पैसा अडका असतो, पण त्यांच्या राहणीमाना वरून तसे वाटत नाही, तसेच गुजरात मध्ये भरपूर पैसा आहें, पण तो कोठेही दिसला नाही. चौकशी अंती असे समजले की, हो, इथे पैसा आहें,पण ह्या प्रांतात तो दाखवला जात नाही, लोक आळशी आहेत, सकाळी दुकाने ११ वाजता उघडतात, पुन्हा दुपारी एक वाजता भोजन व विश्रांती साठी दुकाने बंद ते संध्याकाळी ५ किंवा ६ वाजताच उघडतात. अतिशयोक्ती नाही पण जेवढी माणसे ह्या मार्गावर दिसली नाहीत त्यापेक्षा जास्त थडगी मार्गात आढळली,
साधारण दुपारी ४ चे सुमारास द्वारकेतील द्वारका residency ह्या हॉटेल वर पोहोंचलो. सामान सुमान जागेवर ठेवून चहा पाणी उरकून ताजे तवाने झालो आणि द्वारकाधीश्यांच्या दर्शनास गेलो. एकंदर प्रवासात जे नैराश्य पदरात पडले होते, ते मंदिराच्या परिसरात येवून एकदम लुप्त झाले. भव्य आवार असलेले हे सुमारे ४५०० ते ५००० वर्षे प्राचीन मंदिर म्हणजे कलाकुसरीचे एक जिवंत उदाहरण. संध्याकाळी व सकाळी ७.३० वाजता येथे आरती होते, आरतीचा ताल इतका तालात की पाय आपोआप ताल धरतात. इथल्या पंड्याचे पेहराव एकदम आकर्षक, मला पण पूजे करीता तसा पेहराव घेण्याचा मोह आवरता आला नाही. देवाला तुळसी माळ वहाण्याची येथे प्रथा आहें, मी तुळशीची माळ घेवून आवारात उभा होतो, एक लहान कुरळ्या केसांचा मुलगा बाजूलाच उभा होता, त्याने मला माळ मागितली, मी ती कृष्णाला अर्पण करण्यास घेतली असल्याने देण्याचे नाकारले, पण नंतर मला ह्या विषयी रुखरुख लागली, कारण 'भाव तेथे देव' असे समजून मी त्याला माळ दिली असती, तर माझे फारसे बिघडले नसते, पण त्या क्षणी तसे सुचले नाही. दुपारी १२ वाजता देवाला भोग चढवण्याची येथे रीत दिसली, आम्ही पण भोग चढविला, व प्रसाद रूपाने आम्हाला जे अन्न पाठविण्यात आले ,त्यांनी आमच्या संध्याकाळच्या जेवणाची बेगमी झाली.
तुलाभार , मारवाडी परिवारासाठी एक जबरदस्त आकर्षण, ह्या कार्यक्रमाची योजना यात्रेचे निश्चित झाल्या पासूनच केलेली होती. तुलाभाराची गाथा अशी आहें की द्वारकेपासून दूर डाकुरजी गावी एक दाम्पत्य रहात असे, ते नित्य नियमांनी द्वारकेस कृष्णाच्या दर्शनास येत असत, कित्येक वर्षे हा सराव चालू होता, नंतर त्यांच्या उतारवयात त्याना ते अश्यक वाटू लागले. तेव्हा त्यांनी कृष्णास आपल्या गावी येऊन रहाण्याची विनंती केली, कृष्णास त्यांच्या निस्सीम भक्तीची कल्पना होती, व त्यासाठी त्यांनी ते मान्य केले. हया दाम्पत्यांनी कृष्णाचा तुलाभार, त्या स्त्रीचि नथ आणि तुलसी पत्राने केली होती, त्याच्यामागे एक विशिष्ट विस्तारित कथा आहे , ते मि आता इथे नमुद न करून वाचकानचा भार कामि करतोय
तेव्हा पासून ही तुलाभाराची प्रथा. माझा एकसंष्टी निमित्याने नुकताच तुलाभार झाला असल्याने मी ह्यात फारसा रस दाखवला नाही, विद्याचा तुलाभार करावा असे ठरले, त्या कारणास्तव दान करणे एवढेच , पण येथे दान दुप्पटीने करण्याची प्रथा असल्याचे समजले, म्हणजे जोडपे आले असेल तर एकट्याचा तुलाभार करत नाहीत, मग काय विद्या सोबत मी पण तराजूच्या पारड्यात बसलो, थोडक्यात पण छान विधी होता. जोडप्यातीलं सिनिअर जोडपे म्हणून आम्हाला इतर जोडप्यांनी नमस्कार तर केलाच, पण आहेर ही दिला. कार्यक्रमाच्या एकूण रूपरेखे वर मारवाडी कुटुंबीय खुश, खिसा बर्या पैकी रिकामा झाला तरी आम्ही पण एन्जोय केले. पोटा पाण्याची व्यवस्था आणि निद्रेच्या सहार्या साठी हॉटेल गाठले.
दुसरे दिवशी सकाळी ६ वाजता आमची टीम गोमतिच्या स्नानास रवाना झाली, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो, तसे द्वारकेला समुद्र नदीला येवून भेटतो, नाहीतर बाकी सर्व ठिकाणी नदी समुद्राला मिळते. सरिता स्नान करून पुन्हा देव दर्शनास गेलो, लोणी साखरेचा व तुळसी पत्रांचा नेवैद्य घेऊन , आवारात एक प्रदक्षिणा मारून, बाहेर पडलो, थोडी खरेदी करून हॉटेलवर पोहोंचलो. आजच्या अजेंड्यात बेट द्वारका, नागेश्वर , रुक्मिणी मंदिर, आसपासची छोटी प्रेक्षणीय स्थाने hoti आणि नंतर संध्याकाळ मात्र भाकड .
बेट द्वारका किंवा भेट द्वारका, प्रवास थोडा जोखमीचा पण गमतीचा होता, बस मधून उतरल्यावर प्रथम २ फर्लांग व्हील चेअर वर (आम्ही उभयता) , मग २० ते २५ मिनिटे बोटीतून. प्रचंड वार्यात माणसांनी खचाखच भरलेल्या त्या बोटीत बसणे व पैल तीरावर उतरणे म्हणजे एक दिव्यच होते. सुधृड माणसाची सुद्धा फ्या फ्या व्हावी तेथे आमची काय अवस्था झाली असेल ती कल्पना केलेलीच बरी, आमच्या मदतीला माहेश्वरी परिवार होता म्हणूनच निभावले. केदार बद्री यात्रेत आम्ही डोली, कन्डीतून प्रवास केला होता, पण इथे बोटीतून उतरल्यावर एक नवीन वाहनाने आम्ही बेट द्वारकेच्या देवळापर्यंत सुमारे १ किलो मिटरचा प्रवास केला, ते म्हणजे ठेला. आपण रोज बघतो ती भाजी किंवा फळे विकण्याची हातगाडी, ह्या ठेल्यावर बसून जाण्यात गम्मत वाटली, व येथे अपराधीपणाची जाणीव झाली नाही, कारण हे वाहन चालक व प्रवाश्यास सोपे व सुरक्षित आहें. सुंदर व आकर्षक अश्या handicraft च्या वस्तूने भरलेला मोठा बाजार पार करून आम्ही देवळाच्या प्रवेश द्वाराशी आलो. सुरुवातीस गणपती, शंकर व अन्य देवतांचे दर्शन घेऊन मुख्य मंदिरात गेलो. श्रीकृष्ण आपल्या ८ पटराण्या सोबत येथे निवास करत असे. अत्यंत प्राचीन अश्या ह्या मंदिराची डागडुगी न झाल्याने कुठे रंग उखडलेले , तर कुठे पडझड झालेली, हे original form मधील मंदिर मला खूप आवडले. सुदामा आणि श्रीकृष्ण भेट येथे झाल्याचे सांगतात व म्हणूनच ह्याला भेट द्वारका असे ही म्हणतात . तांदूळ दान देण्याची येथे प्रथा आहें , दान केलेल्या तांदूळातील मुठभर तांदूळ प्रसाद म्हणून देतात , जे आपण घरी परतल्यावर धान्यात मिसळावयाचे ज्यामुळे कधी धान्याची भ्रांत पडत नाही , अशी समज आहें. प्रसाद घेऊन पुन्हा ठेला, बोट, व दोन पायाची गाडी करत बस जवळ आलो
नागेश्वर, पुढचा थांबा, महाराष्ट्रातील हिंगोली तालुक्यातील औन्ढे गावी असलेले नागनाथ, हे आपण १२ ज्योतीर्लीन्गातील एक मानतो, पण कांही लोक गुजरात मधील नागेश्वरला ज्योतिर्लिंग मानतात. मंदिर खूप आकर्षक व स्वछ.आहें. भरपूर मोठे आवार, प्रवेशद्वारात स्वागतास शेकडो कबुतरे, त्या कबुतरांची एखादी सुबक रांगोळी काढल्या सारखी भासली. दर्शन छान झाले , येथील आवारातील शनीचे देवूळ , क्या बात हैं ......दर्शनोत्तर आरती हॉटेल वर मस्त जेवलो आणि मग गोपी तालाब, (कृष्णाच्या रासक्रीडेसाठी प्रसिद्ध) आणि इतर छोटी मोठी स्थाने बघत रुक्मिणी मंदिर गाठले
रुक्मिणी मंदिर, समुद्र किनार्यावर असलेले एक पुरातन मंदिर, रुक्मिणीची मूर्ती बघण्यासारखी, गाभार्यात सोन्याने मढलेला एक तरुण देखणा पंड्या सिंहासन वजा खुर्चीवर बसला होता, त्याला पाहून द्वारकेला सोन्याची द्वारका का म्हणतात त्याचा उलगडा झाला. त्यांनी सर्व यात्रेकरूना खाली बसवून थोडक्यात त्या स्थानचा इतिहास व महत्व सांगितले. ह्या देऊळाच्या २० किलोमीटर परिसरात कोठेही गोडे पाणी मिळत नाही, दुर्वास ऋषींच्या शापामुळे येथील पाणी खारे आहें, आता तो शाप का आणि कशासाठी हे लिहिता ग्रंथ विस्तारेल . खारे पाण्यामुळे येथे हिरवळ नाही, आणि म्हणूनच वंजर जमीन, खारा पानि बीच मे राज करे रुक्मिणी रानी असे ह्या स्थानाला म्हणावेसे वाटते. गोड पाण्याच्या टंचाईमुळे पाणी दाना करीता यथाशक्ती पैसे देण्याचा रिवाज येथे आहें, एक भांडे पाणी, हा इथला प्रसाद. देऊळाच्या बाहेर २० ते २५ साधू ओळीने भिक मागण्या साठी, भिक ? नाही दान घेण्या करीता बसले होते , विशेषता अशी की त्या सर्वांच्या वतीने एक साधू दान मागत होता, व ते मिळाल्यावर सर्व साधू एक कोरस मध्ये कांहीतरी म्हणत होते, बहुदा thanks म्हणत असावे.
संध्याकाळी ५ पर्यंत आम्ही परत द्वारका residency वर परतलो, कांही मंडळी खरेदीसाठी गेले, कांहीनी आराम केला.
दुसर्या दिवशी ८ ला निघायचे ठरवूनही, निघायला १०.३० झाले. सोमनाथच्या दर्शना कडे आता डोळे लागले होते , पण त्या आधी मुळ द्वारका, पोरबंदर बघणे अजून बाकी होते, post retirement म्हणा किंवा कुरुक्षेत्र च्या युद्धा नंतर म्हणा
श्रीकृष्ण द्वारकेस आले , पण द्वारकेचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ज्या ठिकाणी त्यांचा transit कॅम्प होता I mean ते जेथे राहिले होते ते स्थान म्हणजे मुळ द्वारका. बांधकाम बेट द्वारके सारखेच वाटले, एकंदर पुरातन पण प्रेक्षणीय स्थान .
उकाडा खूप भासत होता, म्हणून बाहेर येऊन उसाचा थंड रस प्यायलो.
द्वारकेहून श्रीकृष्ण निजधामास गेले म्हणून असेल, येथे गांभीर्य जाणवते, कांही दुरावल्याचा भास होतो.
मुळ द्वारकेहून निघालो ते पोरबंदर च्यां मार्गाला, ह्या मार्गावर जरा बर्यापैकी घरे, बाजार माणसे दिसली. पोरबंदर पूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधींचे जन्मस्थान. मला भूतकाळात रंगायला खूप आवडते, त्यामुळे ह्या २५० ते ३०० वर्षे जुन्या वास्तूत भटकताना एक निराळेच समाधान मिळाले. मोहनदास करमचंद गांधी ज्या जागी जन्मले तेथे एक स्वस्तिक काढलेले आहें व रोज त्याच्यावर फुले वाहतात. कल्पनेने मी त्यांच्या जन्माचे दृश्य पाहिले. घराचा स्थायी भाव बदललेला नाही हे बरे आहें. येथील सज्जे रूम वजा, म्हणजे खूप मोठे आहेत . पाकिस्तान च्या बाबतीत बापूंचे धोरण चुकले असेल, पण सुखी व समृद्ध कुटुंबातून आलेल्या ह्या महात्म्याचा त्याग नक्कीच वाखाणण्या सारखा आहें. बाजूलाच कीर्ती मंदिर नावाचे एक वस्तू संग्रहालय आहें जेथे गांधीनी वापरलेल्या वस्तू तर आहेतचच पण त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रे पण आहेत.
जे मला अलाहाबादच्या बाबतीत वाटले, तेच येथे पण, नेहरू खानदानाचे जे स्थान, तसेच बिग बी अमिताभचे हे शहर पण त्यामानानी प्रगति दिसली नाही किंवा vow म्हणावे वाटले नाही, तसेच पोरबंदर, राष्ट्रपित्याचे जन्मस्थान पण मागासलेले वाटले
पोरबंदर ते वेरावळ ३ तासाचा रस्ता, अदमासे १ तासानंतर समुद्र किनारा सुरु होतो , समुद्रपट्टी म्हटले म्हणजे नारळी पोफळीच्या बागा, कोळी जमातीची वसाहत, माश्यांचा वास, सर्व अनुभवायास मिळाले. गाडीतून उतरून समुद्रातील प्रचंड लाटा जवळून बघितल्या, खरे तर जल, आग आणि वायूशी खेळ करू नये, पण त्या लाटांनमधून अंगावर उडणारे पाण्याचे तुषार झेलताना भान विसरून जायला होते, थोडा वेळ गम्मत करून पुढे निघालो.
मार्गात नारळी केळीच्या बागा तर दिसल्याच, पण मैलो मैल पसरलेली निरनिराळ्या पिकांची शेते बघण्याची मजा और होती. भुईमुगाची रांगेत लावलेली रोपटी पाहताना, शाळेतील प्रार्थनेसाठी निरनिराळ्या वर्गाची मूले रांगेत उभी असल्याचा भास झाला. फरक एवढाच की येथे सगळ्यांची जात , वर्ण, कक्ष एकच होता. शेतात पक्या बांधणीची व सोयींनीयुक्त घरे दिसली, येथे जरा जवळ जवळ गावे दिसली, थोडी वर्दळ पण बरी होती. प्राथमिक शाळेत "ढ" असलेला विद्यार्थी माध्यमिक किंवा उच्च विद्यालयात गेल्यावर हुशार निघू शकतो, तसे कांहीसे गुजरातच्या ह्या प्रांतात फिरताना मला वाटले. म्हणजे प्रथम दर्शनी माझे गुजरात विषयी जे वाईट मत झाले होते, ते हळू हळू बदलावयास लागले.
संध्याकाळी ७ चे सुमारास आम्ही वेरावळला होतो, सफारी Resort मध्ये आमचे बुकिंग होते, हॉटेलवर जावून मग सोमनाथाच्या दर्शनास जावे, असा विचार होता, पण त्यात वेळाचा अपव्यय होईल असे वाटले, रस्त्यात दुपारी व्यवस्थित आहार झाला होता, कोणी फारसे थकले नव्हते, त्यामुळे सरळ देऊळाचा मार्ग सिधाराला. नुकत्याच मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोट मूळे सुरक्षते करीता नेहमीचा मार्ग बंद होता, त्यामुळे गाडी देवळा जवळ जाणे अश्यक होते, आटोने एक छोट्या व अत्यंत घाणेरड्या बोळीतून आम्ही मंदिराच्या पहिल्या द्वारापाशी आलो. ती बोळ आणि मंदिराचा देखावा ह्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक होता. विजेच्या दिव्यांच्या झगमटात, प्रचंड मोठ्या आवाराच्या मंदिराच्या प्रथमदर्शनीच सर्व त्याच्या प्रेमात पडलो. मुख्य द्वारापासुन् देउळ बरेच लांब होते, मार्ग खूप छान होता,तरीही विद्याला चालणे शक्य नव्हते, त्यामुळे व्हील चेअर घेतली, (मदतीला गणेश होताच) ,मी चालण्याची तयारी दाखवली, पण माणुसकीचे अत्यंत उत्तम उदाहरण मला येथे अनुभवायास मिळाले. श्रीकांत, कोणाचा कोण, लड्डाजीनचा साला, पटकन दुसरी व्हील चेअर घेऊन आला, मला त्यात बसवले व देव दर्शन तर घडविलेच , पण देवळाचा पूर्ण परिसर पण दाखविला. मला आश्चर्य वाटले ते त्याच्या १२ वर्षाचा मुलगा आतिश ह्याचे ,बाबांच्या मदतीसाठी तो पण हातभार लावत होता, आणि श्रीकांतच्या बायकोने कांही आक्षेप घेतला नाही हे पण कौतुकास्पद . लड्डा च्या बहिणीचा १२ वर्षाचा रितेश आणि ५ वर्षांचा रौनक हे पण प्रवासात मदतीचा हात देत होते, विशेष करून रौनक ने प्रवासात रौनक आणली होती. कोठे उतरले की आम्हा दोघाना आमच्या काठ्या देण्याची जिम्मेदारी त्याने स्वखुशीने पत्करली होती. चुकून माझी काठी विद्याने घेतली, तर लगेच वो बाबा की काठी हैं आई, उनको दे देओ म्हणे. तसे सर्वच मंडळी मदत करत होते, पण ही मुले लहान असून हे करत होती म्हणून कौतुक वाटले.
सोमनाथ मंदिराच्या परिसरात १२ ज्योतिर्लिंगे बघण्या सारखी आहेत. देवूळाची वास्तू नवीन आहें , स्वच्छतेची येथे परीकाश्टा दिसते. देवळाच्या boundary वाल ला स्पर्श करणारा, समंदर समंदर यहा से वाहा तक ये मिलोन्की चादर बिछी आसमान तक असा अथांग समुद्र बघतच बसावा वाटतो. अहिल्याबाई होळकर ह्यांनी स्थापित केलेले जुने मंदिर मुख्य दाराच्या जवळच आहें. अभिषेक, पूजा अर्चा ह्या सर्व विधी ह्या देवळात होतात. परीसरात crafts व गुजू कपड्यांची दुकाने आहेत. ...दर्शन घेवून लेमन चहा पिऊन Resort चा ताबा घेतला. पुन्हा दुसर्या दिवशी सकाळी अभिषेक करण्यास सोमनाथ मंदिराला भेट दिली, येथे स्वहस्ते अभिषेक करता येतो. थोडीबहुत खरेदी झाली, नाश्ता केला व परत राजकोट च्या मार्गास लागलो.
'अक्षरधाम' , दिल्लीला अतृप्त राहिलेली लड्डानची इच्छा त्यांना येथे पूर्ण करावयाची होती, पण अक्षरधाम आणि लड्डा ह्यांचे गेल्या जन्मीचे कांही वैर असावे, कारण गोंदाल येथील जे अक्षरधाम त्यांना पहावयाचे होते ते दुपारी चार पर्यंत बंद असल्याचे जितने सांगितले, व तेवढा वेळ थांबलो असतो तर पुढील कार्यक्रम फिस्कटला असता, म्हणून मग दुधाची तहान ताकावर भागवण्या शिवाय गत्यंतर नव्हते, पण हे ताक ही दुधासाराखेच गोड व चविष्ट होते. आम्ही गोंदाल च्या ऐवजी राजकोटचे अक्षरधाम पाहिले, अप्रतिम कलाकृतीचा व चैतन्याचा नमुना. आरतीला अजून वेळ होता, त्यामुळे थोडी विश्रांती घेऊन आम्ही बाहेर पडलो, लड्डा थोडे खट्टू झाले, पण नाईलाज होता.
अक्षरधाम च्या आधी आम्ही वीरपुर येथे जलाराम बापूंच्या मंदिरास भेट दिली, ह्याला मंदिर म्हणण्या पेक्षा मी मठ म्हणेन, कारण तुकाराम, किंवा, गजानन महाराज नाहीतर अक्कलकोटचे महाराज म्हणा तसे हे एक संत होते. येथे कोणत्यही प्रकारचे दान स्वीकारत नाहीत. येथला अरुंद, पण पुण्याची तुळशी बाग किंवा हैदराबाद च्या सुलतान बाजारची बरोबरी करणारा विविध वस्तूंचा बाजार ग्राहकास खरेदी करण्यास भाग पाडतो. थोडक्या वेळात, व माफक दरांत, ताकाच्या रवी पासून, बटवे, कपडे इत्यांदिची आम्ही पण खरेदी केली.
वाटेत, जितने राजकोटची स्मशान भूमी बघण्या विषयी पृच्छा केली, मी म्हटले यात्रेची नांदी तेथून झाली आहें आता पुरे, आपण सीधे हॉटेल वर जाऊ.
मजल दरमजल करत आम्ही राजकोटच्या युरोपा इन्न ला आलो. त्या रात्रीच आमची हैदराबाद आणि मुंबई अशी फाळणी झाली, साडे सतरा मारवाडी पहाटे ५ च्या गाडीने हैदराबादला रवाना होणार होते, व आम्ही चौघे सकाळी ७ च्या गाडीने मुंबईला. एखाद्या मातेने मुलाला प्रवासाला निघताना ज्या पद्धतीने खाण्याचा डबा द्यावा, तितक्याच व्यवस्थित पणे हॉटेल manager ने आम्हाला तेवढ्या सकाळी नाश्ता प्याक करून दिला, भले त्यांनी पैसे आकारले असतील, ते देण्यात प्रेम भाव नसेल ,पण त्यांनी त्याचे कर्तव्य उत्तमरीत्या पार पाडले. परतीच्या प्रवासात आम्ही इतक्या दिवस झालेला निद्रा नाश व्याजासकट वसूल केला.
हैदराबाद ला आल्यावर पुढील यात्रेची (ओमकारेश्वर व महांकालेश्वर) योजना केली, ती झाल्यावर पुन्हा एकदा सर्वाना माझे ब्लॉग वाचण्याची शिक्षा मिळणार आहें, तरी सावधान.